गृहसंकुलांच्या आवारात पोलिसांचा उपक्रम

नीलेश पानमंद, ठाणे</strong>

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे नागरिकांनी गेल्या महिनाभरापासून स्वत:ला घरात कोंडून घेतले असून या चार भिंतीच्या बंदिवान आयुष्यामुळे अनेकांना आता नैराश्य येऊ लागले आहे. अशा नागरिकांचे नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ठाणे पोलिसांच्या चितळसर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गृहसंकुलांच्या आवारात जाऊन पोलीस अधिकारी काही नागरिकांच्या मदतीने करोनाविषयी जनजागृतीबरोबरच हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करत आहेत.

चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गृहसंकुलामध्ये राहणारे किशोर पवार हे एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना संगीत क्षेत्राविषयी आवड असून ते हिंदी आणि मराठी गीते सुरेल आवाजात सादरही करतात. याशिवाय विविध वाद्यही वाजवितात. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्याकडे एक प्रस्ताव दिला होता. घरात राहून येणारे नैराश्य दूर करण्यासाठी आणि नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गृहसंकुलांच्या आवारात हिंदी-मराठी गीते सादर करण्याचा हा प्रस्ताव होता. त्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राठोड यांनी मान्यता देऊन गेल्या शनिवारपासून हा उपक्रम सुरू केला. शालमली, वोल्टास, पंचवटी, चंदन, वसंत विहार, जस्मीन टॉवर, सिद्धांचल, गार्डन एन्कलेव्ह, निहारिका, इडन वुड, लोकपुरम, म्हाडा वसाहत, गावंड बाग, नीळकंठ ग्रीन, शुभारंभ या गृहसंकुलांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये किशोर पवार, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले आणि पोलीस कर्मचारी किरण राऊत यांनी हिंदी-मराठी गीते सादर करून नागरिकांचे मनोरंजन केले. यावेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी घराच्या खिडकी आणि गॅलरीतून टाळ्या वाजवून उपक्रमाला प्रतिसाद दिल्याचे पवार यांनी सांगितले.

करोना विषाणूविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांचे मनोबल उंचावे या उद्देशातून गृहसंकुलांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून यापुढेही हा उपक्रम राबविण्याबाबत विचार सुरू आहे.

जितेंद्र राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चितळसर पोलीस ठाणे.