कल्याण – कल्याण पूर्वतील विठ्ठलवाडी भागातील सत्यम बारवर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून बारचे मालक, कर्मचारी, ग्राहक आणि अश्लिल नृत्य करणाऱ्या महिला अशा एकूण ११३ जणांच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या निर्देशावरून मागील वर्षभरापासून कल्याण, शिळफाटा, डोंबिवली, मलंग रस्ता परिसरातील बारवर पोलिसांच्या विशेष पथकाकडून छापे टाकले जात आहेत. हे बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अश्लिल नृत्य, मोठ्या आवाजात वाद्यवृंद वाजविणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. सत्यम बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. याठिकाणी महिला अश्लिल नृत्य करत असल्याच्या तक्रारी पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाकडे आल्या होत्या. पोलिसांच्या विशेष पथकाने या बारवर रविवारी रात्रीच्या वेळेत छापा टाकला. त्यावेळी तेथे अश्लिल नृत्य सुरू असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांचा छापा पडताच बारमधील ग्राहक, कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. पोलिसांनी बारचे दोन्ही दरवाजे बंद करून ग्राहक, कर्मचाऱ्यांना एका जागी बसण्यास सांगितले.
या बारमध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ महिला ग्राहक सेविका होत्या. पाच पुरूष ग्राहक सेवक, ६३ ग्राहक होते. पोलिसांनी सत्यम बारचे मालक, व्यवस्थापक यांच्यासह बारमध्ये उपस्थित महिला गायिका, सेविका, कर्मचारी, ग्राहक यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला. या गैरकृत्याबद्दल पोलिसांनी सत्यम बारचे चालक, मालक, व्यस्थापक यांना अटक केली.
कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार आहेत. त्या पोलीस ठाण्याला माहिती न देता अन्य पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकायचा अशी पध्दत उपायुक्त झेंडे यांनी सुरू केली आहे. त्यामुळे यापुर्वीची पोलीस, बार चालक यांची जुनी साखळी तुटली आहे.
कल्याण, डोंबिवली शहर परिसरात अंमली पदार्थ विरोधी आणि बारच्या आडून अश्लिल नृत्य, गैरप्रकार करणाऱ्या बार चालकांविरुध्द कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम सुरूच राहणार आहे, असे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.