बदलापूरः कायद्याचे ज्ञान नसल्याने अन्यायाची जाणीव नसलेले अनेक आदिवासी बांधव वेठबिगार अथवा विटभट्टीवर आयुष्यभर राबतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या संरक्षणाची आणि अन्यायाची जाणीव व्हावी यादृष्टीने ठाणे ग्रामीण पोलिसांनी आपले पोलीस ठाणे हे फिरत्या पोलीस ठाण्याचे अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून त्यांना चित्रफितींच्या माध्यमातून कायद्याचे ज्ञान दिले जाते आहे. यासाठी डिजीटल वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यांवर आदिवासी बांधवांचे प्रबोधन केले जाते आहे.
ठाणे जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी वेठबिगारीच्या, कामगारांवर अन्यायाच्या घटना समोर आल्या होत्या. सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून आदिवासी बांधवांना, वेठबिगारीच्या दृष्टचक्रातून सोडवले होते. अन्याय होत असतानाही त्याची जाणीव नसल्याने आणि आपल्यासाठी कायदा आहे ही माहिती नसल्याने वर्षानुवर्षे आदिवासी बांधव कुटुंबासहित काही धनदांडग्यांकडे राबत असल्याचे समोर आले होते. त्यांना वेठबिगारी मुक्तीचे पत्र देऊन त्यांची सोडवणूक करण्यात आली. यावेळी काही मालकांवर कारवाईही करण्यात आली. त्यानंतर आदिवासी बांधवांचे प्रबोधन करण्याची गरज व्यक्त झाली होती.
अखेर ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला. सध्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवर, गावागावांमध्ये चित्रफितींच्या माध्यमातून भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेबाबत माहिती दिली जाते आहे. यासाठी पोलिसांचे डिजीटल वाहन ठिकठिकाणी भेट देत असते. जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये, आश्रम शाळा, वसतीगृह, पाडे, ग्रामीण भागातील चौक, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी ही वाहने उभी केली जातात. त्यावर कायद्याची, अन्यायाची जाणीव करून देणाऱ्या चित्रफिती दाखवल्या जातात. त्या माध्यमातून त्यांना जागृत केले जाते आहे.
कायदे आणि अधिकारांची जाणीव
ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी यांनी, आदिवासी बांधवांना नव्या कायद्यांची माहिती देणे आणि त्यांच्यात जनजागृती करणे हा या मोहिमेचा हेतू असल्याची त्यांनी सांगितले आहे. बालविवाह, कामगा हक्क, बालकामगार, वेठबिगारी याबाबतच्या कायद्यांबद्दल आदिवासी बांधवांना माहिती नसते. त्यासाठी ही माहिती पोहोचवली जाते आहे. यातून त्यांच्याशी संवाद साधनेही हेतू असून त्यातून आदिवासी प्रश्नही विचारतात.
महिलांशी थेट संवाद
सध्या सुरू असलेल्या या मोहिमेतून महिलांशी संवाद साधला जातो आहे. महिलांना महिला पोलीस कर्मचारी कायदे समजावून सांगतात. तक्रार कशी केली जाते. त्याबाबतची माहितीही दिली जाते. त्यामुळे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.