प्रभाग रचना फुटल्याने ठाण्यात राजकीय द्वंद्व

प्रभाग रचना तसेच अनुसूचित जमाती आणि जातींच्या आरक्षणाचा सविस्तर तपशीलही आदल्याच दिवशी उघड झाला.

 

आरक्षण सोडतीला विरोध करणारे मनसे नेते ताब्यात

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा तपशील काही आरक्षणांसह सोडतीपूर्वीच उघड झाल्याने या प्रक्रियेत गौडबंगाल झाल्याचा आरोप करत शुक्रवारी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आरक्षण सोडत स्थगित करण्याची मागणी केली. सोडत जाहीर होण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेत हा तपशील बाहेर कसा पडला असा प्रश्न उपस्थित केला, तर सोडत सुरू असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतन येथे महापालिका प्रशासनाविरोधात घोषणा देत सभागृह डोक्यावर घेतले. या वेळी पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील प्रक्रिया अडथळ्याविना पार पडली.

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत शुक्रवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली होती. या सोडतीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले असतानाच प्रभाग रचनेतील महत्त्वाचा तपशील आदल्या दिवशीच उघड झाला. हा तपशील काही नगरसेवकांकडून समाजमाध्यमांवरून पसरविला जात होता. प्रभाग रचना तसेच अनुसूचित जमाती आणि जातींच्या आरक्षणाचा सविस्तर तपशीलही आदल्याच दिवशी उघड झाला. यासंबंधीचे सविस्तर वृत्त वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्याने यासंबंधीच्या चर्चेत एकप्रकारे दुजोरा मिळाला.  हा तपशील कसा बाहेर पडला याविषयी महापालिका प्रशासनाने एकीकडे मौन बाळगले असताना शिवसेनेचे स्थानिक नेते आणि काही दिग्गज नगरसेवकही याविषयी शांत होते. त्यामुळे या प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित करत दुपारच्या सुमारास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेत ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ठरल्या वेळेतच या सोडती घेण्यात येतील, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गडकरी रंगायतन येथे ही प्रक्रिया सुरू होताच सभागृहात तळ ठोकून बसलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रक्रिया थांबवावी अशी मागणी करताच इतर कार्यकर्त्यांचाही आवाज वाढला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मात्र कोणताही विरोध केला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Political issue in thane on ward reservations