कार्यकर्त्यांची वानवा असल्याने कष्टकऱ्यांचा प्रचारात वापर

रोज काम मिळेलच याची शाश्वती नसणाऱ्या या कामगारांना आता रोज ३०० ते ४०० रुपयांची कमाई होऊ लागली आहे.

निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची टंचाई भासत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी कष्टकरी कामगार, मजुरांना प्रचारात उतरविण्याचे जुनेच तंत्र अवलंबिले आहे. पदयात्रा, प्रचारफेरी यासाठी हक्काचे मनुष्यबळ शोधण्यासाठी अनेकजण झोपडपट्टीतील घर कामगार महिलांकडे व शहरातील मजूर अड्डय़ावर धाव घेताना दिसत आहेत. रोज काम मिळेलच याची शाश्वती नसणाऱ्या या कामगारांना आता रोज ३०० ते ४०० रुपयांची कमाई होऊ लागली आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची कमतरता जाणवू लागली आहे. शक्तिप्रदर्शनासाठी लागणारे संख्याबळ भरून काढण्यासाठी छोटे मोठे काम करणाऱ्या वर्गाची मदत घेतली जात आहे. यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळीच मजूर अड्डा तसेच झोपडपट्टी विभागात जाऊन प्रचारासाठी त्यांची मागणी करत आहेत. यातही कार्यकर्त्यांचा जवळ असणारा प्रमुख या कामगारांचे गट बनवून त्यांना विविध पक्षांच्या प्रचारासाठी पाठवीत आहे. यात २५ जणांचे पैसे एकदम घेऊन त्यात स्वतचा वाटा काढून घेऊन कामगारांना इतर पैशांचे वाटप करतात. यामुळे या म्होरक्यांची तर काम न करता कमाई सुरू आहे. हे गटही आज एका पक्षाच्या प्रचारात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षाच्या प्रचारात सामील झाल्याचे दिसून येत आहेत. घरकाम करणाऱ्या महिला व मोलकरींना दुपारच्या वेळेत काम पूर्ण करण्याची विनंती करून सकाळ-संध्याकाळ निवडणूक प्रचाराच्या कामास नेले जात आहे. उमेदवार पायी प्रचारात तसेच ते जेव्हा घरोघरी भेट देतात त्यावेळी त्याच्यासोबत केवळ उपस्थित राहण्याचे काम या कार्यकर्त्यांना दिले जात आहे. कमी कष्टात चांगला रोजगार, जेवण, नाश्ता पाणी मिळते. अर्धदिवस काम केले तर २०० रुपये व पूर्ण दिवसाचे ३०० ते ४०० मिळतात यात वावगे काही नसल्याने हे कामगार सध्या कार्यकर्ते बनले आहेत. बांधकाम मजूर व घरकाम महिला या प्रचाराच्या कामात व्यस्त असल्याने नागरिकांना कामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Political party use labor for election campaign