कल्याण-डोंबिवलीत कोंडी
उच्च न्यायालयाचे आदेश, पालिकेने केलेली नियमावली धुडकावून लावत कल्याण, डोंबिवलीत भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी भर रस्त्यात दहीहंडय़ा बांधून वाहतूक कोंडीत भर घातली. महापालिकेवर स्वतंत्रपणे सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजप, शिवसेनेमध्ये तर रस्त्यावर दहीहंडय़ा बांधण्यात चुरस लागली होती. डोंबिवलीत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बाजीप्रभू चौक, मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी चार रस्त्यावर (पाटणकर चौक), कल्याणमध्ये भाजप, शिवसेनेने सहजानंद चौक आणि शिवाजी चौक या वर्दळीच्या रस्त्यांवर दहीहंडय़ा बांधून वाहनांसह नागरिकांची कोंडी केली.
कल्याण डोंबिवली पालिकेने उत्सव साजरे करण्यासंदर्भात कठोर नियमावली केली आहे. या नियमावलीमुळे या वेळी दहीहंडी उत्सव वर्दळीचे रस्ते सोडून आतील गल्ल्या, रस्त्यांच्या कोपऱ्यावर साजरे केले जातील, असे नागरिकांना वाटत होते; परंतु बहुतांशी दहीहंडय़ा राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने परवानगी नाकारून त्यांचा रोष न घेण्यात पालिका अधिकाऱ्यांनी धन्यता मानली. रस्त्यावर उत्सव साजरे करण्यास परवानगी देऊन नियमावलीतील अटी-शर्तीचे उल्लंघन झाले, तर ती जबाबदारी संयोजकांची, असे सांगत पालिका अधिकाऱ्यांनी राजकीय दहीहंडय़ांना परवानग्या दिल्या आहेत. स्थानिक वाहतूक पोलीस, पोलीस अधिकारी यांच्याशी मैत्रीचे नाते असलेल्या लोकप्रतिनिधींनी थेट मुख्य वर्दळीचे रस्ते अडवून, लोकांना दिसेल अशा अविर्भावात दहीहंडय़ा बांधून नेहमीप्रमाणे आपल्या संपत्तीचे प्रदर्शन घडवले.
डोंबिवलीत चौक अडवला
डोंबिवलीत बाजीप्रभू चौकात केडीएमटीचे आगार, मंदिर, बाजार असा गजबजाट आहे. रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी, वाहनांना मानपाडा रस्त्याला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या चौकात शनिवारपासून आमदार चव्हाण यांचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी व्यासपीठ उभारण्याची लगबग सुरू झाली आणि नागरिकांच्या चिंतेचा सूर वाढला. कोंडीची तमा न बाळगता बाजीप्रभू चौकात नेहमीच्या दणक्यात, दुष्काळी परिस्थितीचा विचार न करता भाजपचे पदाधिकारी दहीहंडी उत्सव साजरा करीत होते.
भिवंडीत एकाचा मृत्यू
दहीहंडी बांधत असताना विजेचा खांब कोसळून एक जण ठार झाला. गणेश पाटील (२९) असे मृताचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील दिघाशी या गावात रविवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर अंबाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश याच्या पश्चात पत्नी व आठ महिन्यांचा मुलगा आहे.

बॉलीवूड कलाकारांची गर्दी ओसरली
गेली काही वर्षे मुंबईतील दहीहंडीला नित्यनेमाने हजेरी लावून आपली आणि आपल्या चित्रपटांची लोकप्रियता वाढवणारे बॉलीवूड कलाकार अनुपस्थित होते. मोठमोठय़ा राजकीय नेत्यांच्या दहीहंडी सोहळ्यात केवळ व्यासपीठावर उभे राहण्यासाठी बॉलीवूडचे आघाडीचे सलमान आणि शाहरूख खान हे एक कोटी रुपये घेणार इथपासून ते बॉलीवूडच्या तिसऱ्या म्हणजेच अगदी नवख्या पिढीतील कलाकारही लाखांच्या घरात पैसे घेऊन दहीहंडीला उपस्थित राहणार, अशा चर्चाना पेव फुटले होते. प्रत्यक्षात, दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या ‘कॅलेंडर गर्ल्स’ आणि सलमान खान प्रॉडक्शनच्या ‘हिरो’ची टीम वगळता अन्य कोणतेही कलाकार दहीहंडी सोहळ्याकडे फिरकलेच नाहीत. वरळी, ठाणे, घाटकोपर येथे होणाऱ्या नेत्यांच्या दहीहंडीला कलाकारांची हजेरी असतेच. शाहरूख, सलमान, अजय देवगण, अक्षयकुमार, राणी मुखर्जी, जॉन अब्राहम, अर्जुन रामपाल, रणवीर सिंह, माधुरी दीक्षित याशिवाय मराठी कलाकारही हंडय़ांपासून दूर राहिले.

नागरिकांची नाराजी
राज्याचा अर्धा भाग दुष्काळाने होरपळत आहे. अनेक सामाजिक संस्था, अभिनेते किडूकमिडूक जमा करून तेथील आपल्या बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकार या दुष्काळामुळे जेरीस आले आहे. अशा परिस्थितीत भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी लाखो रुपयांच्या हंडय़ा बांधून केलेल्या पैशांच्या उधळपट्टीबद्दल नागरिकानी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पाण्याची उधळपट्टी
कल्याणमध्ये वर्दळीच्या शिवाजी चौकात शिवसेनेने दहीहंडी बांधली होती. त्यापुढच्या सहजानंद चौकात मुख्य रस्त्यावर भाजपने दहीहंडी बांधली होती. दहीहंडी बांधण्यासाठी अनेक ठिकाणी क्रेनचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली होती. सहजानंद चौक येथे तर भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी टँकर आणून पाणी वाया घालवले. दरम्यान ठाण्यात जखमी झालेल्या ११ गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयात दाखले करण्यात आले आहे.

लोकांचे लक्ष आहे..

मंडप आणि ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने लादलेले र्निबध झुगारून नियमांचा भंग करणाऱ्या दहीहंडी पथकांविषयी सजग वाचकांनी ‘लोकसत्ता’कडे पाठवलेल्या निवडक प्रतिक्रिया व छायाचित्रे..

भांडुप पूर्वेकडील संजय अपार्टमेंट परिसरात रस्ता अडवून गोविंदा पथकांसाठी मंडपाची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता; तसेच वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. – महेश घाणेकर
———
गिरगावच्या शिवसेना शाखा क्रमांक २१५ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांसाठी मंडपाची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून येथे गणेशोत्सवासाठी मंडपउभारणीही सुरू आहे.
– दिलीप तोलकर
—–
परळ येथील सदाकांत ढवण मैदान व परळ टीटी येथे अनेक गोविंदा पथकांनी आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करून कानठळ्या बसतील एवढय़ा आवाजात डीजे लावले होते. – योगेश कांबळी
———
विक्रोळी कन्नमवारनगर येथे दुर्गामाता मैदानात कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. – सुरेखा जी.

माहीम येथील टी. एच. कटारिया मार्गावर उभारण्यात आलेला मंडप. या मंडपाला पोलिसांचे संरक्षण लाभले होते. याबाबत विचारले असता महापालिकेची परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
– प्रकाश टिकरे