ठाणे : गुढीपाडव्याच्या सभेतील भाषणानंतर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा घेण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. ही सभा गडकरी रंगायतन नाटय़गृहाजवळील मूस चौकात घेण्यास परवानगी देण्याची मागणी मनसेने पोलिसांकडे केली असली तरी नाटय़गृहामधील नियोजित कवी संमेलनाच्या कार्यक्रमामुळे पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. कवी संमेलनाला मंत्र्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्यामुळे सुरक्षेच्या तसेच वाहतूक कोंडीच्या कारणास्तव पोलिसांनी मनसेला सभेसाठी मूस चौकाऐवजी शहरातील दोन ठिकाणांचे पर्याय दिले आहेत.  मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मूस चौकात सभा घेण्याचा आग्रह धरत परवानगी दिली नाहीतरी आम्ही त्याच ठिकाणी सभा घेऊ असा इशारा दिला आहे. यामुळे पोलिसांपुढे  पेच निर्माण झाला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत हिंदूत्वाचा पुरस्कार करत मदरशांवर धाडी घाला आणि मशिदींवरील भोंगे काढा असे विधान केले होते. या विधानानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती.  शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात राज यांच्या सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. गडकरी रंगायतन नाटय़गृहाजवळील मूस चौकात राज ठाकरे यांची सभा  घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. सभेला अद्याप परवानगी नाकारलेली नाही.

सभा इथेच होणार,  गुढीपाडव्याच्या सभेनंतर जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली असून ही सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावरच होईल. यापूर्वीही आम्ही याठिकाणी सभा घेतलेल्या असल्यामुळे या सभेच्या परवानगीत कोणतीही अडचण येणार नाही. प्रक्रियेला वेळ लागत असला तरी परवानगी मिळेल.

— नितीन सरदेसाई, मनसे नेते