ठाणे – जिल्ह्यात सुरु असलेल्या नवीन मतदार नोंदणीमुळे काही मतदान केंद्रावर तब्बल पाच हजार हुन अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. यामुळे येत्या निवडणुकीत या केंद्रांवरील भार मोठया प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तेथील मतदारांचे विभाजन करून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार शहरी भागातील एका मतदान केंद्रांवर १ हजार ५०० तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर १ हजार २०० इतकी मतदारांची संख्या ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ६४ लाख ६९ हजार १७९ इतकी असून यामध्ये ५० हजार ११८ इतक्या नाव मतदारांची संख्या आहे. तसेच ७४२ इतक्या तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी झाली आहे. तर जिल्ह्यात सध्या ६ हजार ४४८ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे आणि नवीन मतदार नोंदणीचे काम सुरु आहे. या अंतर्गत काही मतदान केंद्रावर ५ हजाराहून अधिक मतदारांची नोंदणी झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवरील भार कमी करण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या शिफारसी नुसार मतदार नोंदणी नमुन्यांमध्ये देखील महत्वाचे बदल करण्यात आले आहे. या अंतर्गत अर्ज नमुना क्रमांक ६ हा केवळ नवमतदारांच्या नाव नोंदणी साठी असणार आहे. तर ६ ब मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्यासाठीचा अर्ज असणार आहे. अर्ज नमुना क्रमांक ७ ब हा मतदार यादीतून मतदाराचे नाव वगळणी करण्यासाठी आणि मतदार यादीतील नावार आक्षेप घेण्यासाठी असणार आहे. तर अर्ज नमुना क्रमांक ८ अ दुसऱ्या मतदार संघात नाव नोंदणीसाठी, ८ ब मतदार यादीतील दुरूस्ती करण्यासाठी, ८ क नवीन ई मतदान ओळखपत्र मागणी करण्यासाठी आणि ८ ड दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करण्यासाठी असणार आहे.

वर्षातून ४ वेळेस मतदार याद्या अद्यावत होणार भारतीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून चार वेळेस मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम हा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यामुळे ज्या तारखेला अर्जदाराचे वय १८ पूर्ण होईल त्यादिवशी त्याचा अर्ज मंजूर करता येणार आहे. अर्जदाराला मतदान यादीत नाव येण्यासाठी वर्षभर तात्कळत राहावे लागणार नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polling centers in thane district will increase zws
First published on: 08-08-2022 at 21:26 IST