scorecardresearch

शहर अभियंता विभागाची निष्क्रियता , टिटवाळा-बल्याणी-आंबिवली रस्त्याची दुरवस्था

वर्षभर त्रास सहन करून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन या वर्दळीच्या रस्त्याची देखभाल करत नसल्याने या भागातील रहिवासी, माजी नगरसेवक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत

poor road condition of Titwala-Balyani-Ambivali of KDMC
टिटवाळा-बल्याणी-आंबिवली रस्त्याची दुरवस्था

कल्याण- नवीन कल्याणचा एक महत्वपूर्ण भाग असलेल्या आंबिवली, बल्याणी, मोहने आणि टिटवाळा परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रहिवाशांना खड्डे, चऱ्या, तुटलेल्या कडांच्या रस्त्यांवरून येजा करावी लागते. वर्षभर त्रास सहन करून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन या वर्दळीच्या रस्त्याची देखभाल करत नसल्याने या भागातील रहिवासी, माजी नगरसेवक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

रिक्षा चालक, रहिवाशांनी पालिकेने मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली नाहीतर शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. दीड वर्षापासून आंबिवली, बल्याणी भागातील नगरसेवक, रहिवासी पालिकेच्या शहर अभियंता विभाग, बांधकाम विभागाकडे दुरवस्था झालेल्या बल्याणी रस्त्याची दुरुस्ती करा म्हणून तगादा लावून आहेत. या महत्वपूर्ण रस्त्याकडे शहर अभियंता सपना कोळी यांनी वर्षभरात लक्ष न दिल्याने बल्याणी रस्त्याचा विषय रेंगाळला, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

प्रभागातील अभियंत्यांनी नादुरुस्त झालेल्या रस्ते कामाचे प्रस्ताव शहर अभियंता विभागाकडे पाठविले की ते तात्काळ मंजूर करण्याऐवजी लालफितीत ठेवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अभियंत्यांच्या चर्चेतून समजते. अनेक वेळा निधीचे कारण सांगून शहर अभियंता विभाग नस्ती मंजुरीची प्रक्रिया करत नसल्याचे अभियते सांगतात.

आंबिवली-टिटवाळा भागातील हजारो रहिवासी दररोज कल्याण रेल्वे स्थानकात उतरून रिक्षा, खासगी वाहनाने आंबिवली, टिटवाळा, मोहने, बल्याणी परिसरात प्रवास करतात. बल्याणी येथील खराब रस्त्यामुळे अनेक वेळा रिक्षा चालक या रस्त्यावरून प्रवासी भाडे घेऊन येण्यास तयार होत नाहीत. शहर अभियंता विभागाकडून बल्याणी रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील एक जागरूक रहिवासी प्रवीण आंबरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. शहर अभियंता कोळी यांच्या संथगती कामामुळे आम्हाला लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते, असे अभियंत्यांचे खासगीत म्हणणे आहे. नगरसेवकांची राजवट पालिकेत नसल्याने त्याचा गैरफायदा शहर अभियंता विभाग घेत आहे, असे माजी नगरसेवकांनी सांगितले. पालिकेत सत्ता स्थापन झाली की गेल्या तीन वर्षात शहर अभियंता विभागाने विकास आराखड्यातील किती रस्ते बांधले, नवीन रस्त्यांची बांधणी केली याविषयी आम्ही जाब विचारणार आहोत, असे ज्येष्ठ नगरसेवकाने सांगितले.

टिटवाळा-बल्याणी-आंबिवली रस्त्यासाठी नऊ ते १० कोटीचा निधी अपेक्षित आहे. पालिकेकडे निधी नसल्याने या रस्त्यावरील वैष्णोदेवी मंदिर ते आंबेडकर चौक या अर्ध्या रस्त्याचे काम हाती घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. हा अर्धवट रस्ता करून प्रशासन काय साध्य करणार आहे. या भागातील विकासकांकडून पालिकेने कोट्यवधी रुपयांचा विकास अधिभार वसूल केला आहे. तो पैसा कुठे गेला. तो पण करोनाच्या नावाने उधळला का, अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून दिल्या जात आहेत. शहर अभियंता सपना कोळी रजेवर असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. शहर अभियंता विभागाचा प्रभारी पदभार तरूण जुनेजा या प्रामाणिक, कर्तव्यात कठोर असलेल्या कार्यकारी अभियंत्याकडे आल्याने त्यांनी यापूर्वीच्या शहर अभियंता विभागात साचलेल्या सर्व नस्ती मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे अभियंता, ठेकेदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

बल्याणी रस्त्यावरील वैष्मोदेवी मंदिर-आंबेडकर चौक रस्त्याची निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. या कामासाठी नऊ कोटी निधी प्रस्तावित आहे. – जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-06-2022 at 13:06 IST
ताज्या बातम्या