अनुषा मनी हिचे पॉप संगीताचे सुर आणि दिव्य कुमार यांची सुफी मैफल असा अप्रतिम सांगीतिक मिलाफ शनिवारी अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी रसिकांनी अनुभवला. अनुषा मनीच्या गीतांवर तरुणाईने ठेका धरला तर दिव्य कुमारने सादर केलेल्या सुफी गीतांना रसिकांनी दाद दिली. डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित आणि ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी हजेरी लावली. त्यांनी अयोध्येतील राम मंदिरानंतर अंबरनाथचे शिव मंदिरच, असे मत व्यक्त केले. मी पाहिलेले अंबरनाथ वेगळे होते, डॉ श्रीकांत शिंदे, डॉ बालाजी किणीकर यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलला, ही शिवसेनेची पुण्याई आहे, असेही संजय राऊत म्हणाले. शिव मंदिर महोत्सवामुळे अंबरनाथ शहराचे नाव देशात पसरले असून एक दिवस खुद्द पंतप्रधान या फेस्टिवलला हजेरी लावतील, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.
मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन
मेणाच्या पुतळे या फेस्टिव्हलच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यामध्ये ऑस्ट्रेलियन अभिनेत्री निकोल किडमन, अमेरिकन अभिनेता ब्रॅड पिट, जाँन क्रिस्टोफर आणि अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांच्यासह ब्रिटीश अभिनेता डँनियल क्रेग, जॅकी चन आणि लहान मुलांना आकर्षित करणारा रोवन अॅटकिन्सन म्हणजेच लहान मुलांचा लाडका मिस्टर बीन, विविध फुटबॉल पटू तसेच विविध कलाकारांचे मेणाचे पुतळे आहेत.
चित्रांचे प्रदर्शन
देशातील प्रसिद्ध चित्रकारांची चित्र आणि त्यांची प्रत्यक्ष भेट दरवर्षीप्रमाणे रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. देशाच्या विविध राज्यांतील आणि महाराष्ट्रातील स्थानिक चित्रकारांच्या चित्रसंस्कृतीचा संगम या फेस्टीव्हलमध्ये रसिकांना अनुभवला. यामध्ये श्रीकांत जाधव, अंजली गवळी, दिवंगत गुलजार गवळी, प्रतिमा वैद्य यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
आज जुबिन नौटियाल
अल्पावधीत तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबिन नौटियाल याच्या गायकीने रविवारी अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवलची सांगता होणार आहे.