माजिवडा, नितीन उड्डाणपुलाची दुरुस्ती

ठाणे : दरवर्षी पावसाळ्यात शरपंजरी असणाऱ्या ठाण्यातील माजिवडा आणि नितीन कंपनी उड्डाणपुलाची डागडुजी करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या दोन्ही पुलांवर पावसाळ्यापूर्वी मास्टिक तंत्रज्ञानाने डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी रस्ते विकास महामंडळाने वाहतूक विभागाकडे परवानगी मागितली आहे. वाहतूक विभागाने या कामांसाठी अद्याप परवानगी दिली नसली तरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा या कामासाठी असलेला आग्रह लक्षात घेता येत्या काळात ही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या महिनाभरात ही कामे सुरू होण्याची चिन्हे असून यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचीही कामे सुरू आहेत. त्यामुळे हा मार्ग अरुंद झाला आहे. दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावरील माजिवडा आणि नितीन कंपनी उड्डाणपुलावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी एमएसआरडीसीने काही महिन्यांपूर्वी येथील उड्डाणपुलांवर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांचे डांबरीकरण केले होते. तसेच घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या नितीन आणि माजिवडा उड्डाणपुलांवर रस्ते दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नव्हते. हे काम आता राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेत ही कामे करण्यात येणार असून एमएसआरडीसीने ठाणे वाहतूक शाखेकडे त्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच पावसाळ्यापर्यंत या उड्डाणपुलांचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

वाहतूक नियोजनाची तयारी

शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने या कामासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. असे असले तरी येत्या काही दिवसांत ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही उड्डाणपुलांची कामे करणे गरजेचे आहे. ही कामे करत असताना महामार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणारी कोंडी लक्षात घेता यासाठी उपाय आखले जात आहेत, अशी माहिती वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घोडबंदरहून मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर या दुरुस्ती कामाचा परिणाम दिसून येणार आहे.

काय होऊ शकते?

एमएसआरडीसीने रात्रीच्या वेळेत कामाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. ठाणे शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत वाहतुकीस परवानगी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत गुजरात वसईहून भिवंडी नाशिकच्या दिशेने हजारो अवजड वाहने माजिवडा उड्डाणपुलावरून जात असतात, तर नितीन कंपनी उड्डाणपुलाचा वापर खासगी वाहनचालकांकडून सर्वाधिक होत असतो. उड्डाणपूल बंद झाल्यास या सर्व वाहनांना उड्डाणपुलाखालील मार्गावरून सोडावे लागणार आहे. उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहने ठाणे, मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यामुळे खालील रस्त्यावर भार येऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.