ठाणे : मुंबई तसेच आसपासच्या शहरांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांनी ठरलेल्या वेळेत परीक्षा घेण्यास सुरुवात केली असली तरी ठाणे शहरातील काही शाळांनी शासनाच्या परिपत्रकावर बोट ठेवत परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. काही शाळांनी सुरू असलेल्या तर, काही शाळांनी नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत मौन धारण केल्याचे दिसून येत आहे. परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन पालकांनी सुट्टय़ांची गणिते तसेच दौरेही आखलेले असतात. ऐनवेळी बदललेल्या वेळापत्रकामुळे पालकांची तारांबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करत १ ली ते ९ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार ६ ते १८ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार होत्या. याच दरम्यान राज्य शासनाने परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात घ्याव्यात असे परिपत्रक काढले. या परिपत्रकाचा आधार घेत काही शाळांनी परीक्षांचे वेळापत्रक बदलले. शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेत ठाणे शहरातील अनेक शाळा व्यवस्थापनांना अचानक एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षा घेण्याची आठवण झाली. यापैकी काही शाळांनी नियोजित १ ली ते ९ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलल्याच्या तक्रारी आता पालकांकडून करण्यात येत आहेत. मुलांच्या परीक्षा हा संवेदनशील विषय असल्याने या निर्णयास विरोध तरी कसा करायचा असा पेच पालकांपुढे निर्माण झाला आहे.
मन मानेल ते धोरण
कळव्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत परीक्षा सुरू असून ८ एप्रिलला संपणार होत्या. या शाळेनेही परीक्षांचे वेळापत्रक बदलत परीक्षा पुढे ढकलल्या. यामुळे परीक्षा १२ एप्रिलला संपणार आहेत, अशी माहिती पालकांनी दिली. काही शाळांनी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली होती. आता परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेली दोन वर्षे करोना संकटामुळे नागरिक बाहेरगावी फिरायला गेले नव्हते. आता र्निबधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर पालकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले होते. त्यासाठी आवश्यक तिथे आरक्षण करण्यात आले होते. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हे सगळे वेळापत्रक कोलमडून गेले आहे, अशी माहिती काही पालकांनी दिली. यासंदर्भात ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
