ठाणे : ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा, कापुरबावडी उड्डाण पुलावरील मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आलेली असतानाच, या मार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच मुंबई-नाशिक मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असून त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे खारेगाव नाका, माजिवाडा, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होते. त्याचा परिणाम, शहरातील अंतर्गत मार्गांवर दिसून येतो. यंदाही हे चित्र कायम असल्याचे शनिवारी दिसून आले.

हेही वाचा >>> मुंब्रावासियांचा पाण्यासाठी तिरडी मोर्चा; संतप्त नागरिकांनी फोडली मडकी

गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाला सुरूवात झाली. परंतु अर्ध्या तासांच्यावर पाऊस पडत नव्हता आणि पावसाचा जोरही फारसा नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून त्याचबरोबर सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा पुलावरील घोडबंदरहून नाशिक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे पडले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आले होते. मास्टीक पद्धतीने या रस्त्याची बांधणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हेही वाचा >>> ठाणे कारागृहाच्या जागेवर उद्यान उभारणीच्या प्रस्तावाला वेग; भाजपाचा मात्र विरोध

या पुलावरून अवजड, हलक्या वाहनांसह दुचाकींची वाहतूक सुरु असते. या सर्व चालकांना खड्डे चुकत प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव चौकाजवळील रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात आणि कोंडीची समस्या निर्माण होते. यंदाही पहिल्याच पावसात याठिकाणी खड्डे पड़ले असून ते संबंधित विभागाकडून बुजविण्याची कामे सुरु आहेत. या मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असतानाच, त्यात खारेगाव टोलनाका भागात खड्डे पडल्यामुळे शनिवारी येथे कोंडी झाली. मुंब्रा बाह्य वळण मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच माजिवाडा येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली होती. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांना पावसाळ्यात कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.