ठाणे : पावसाचा जोर वाढल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात मुंबई आणि ठाणे उपनगरांत खड्डय़ांचा जाच सुरू झाला आहे. सर्वच भागांत वाहतूक कोंडीचे चित्र असून, ठाणे जिल्ह्यात आठवडय़ात खड्डय़ांत पडून दोघांचा मृत्यू झाला. पावसाच्या आरंभीच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरील खड्डय़ांमुळे बुधवारी ठाणे आणि भिवंडी शहरात चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. साकेत पूल ते भिवंडी येथील रांजनोली नाक्यापर्यंत आणि ठाण्यातील आनंदनगपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अनेकांना वेळेवर कामावर पोहोचता आले नाही. काहींना अर्ध्या वाटेतूनच माघारी परतावे लागले. अर्ध्या तासाचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना सुमारे दोन तास लागत होते. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी सायंकाळी ६ वाजेनंतरही कायम होती.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही ठाण्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांकडून समाजमाध्यमावर रोष व्यक्त केला जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल अत्यंत अरूंद आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. नाशिक, भिवंडी येथून हजारो वाहने या पुलावरून मुंबई, ठाण्याच्या दिशेने जातात. परंतु, खड्डय़ांमुळे साकेत पूल ते भिवंडी येथील रांजनोली नाका म्हणजेच, सात ते आठ किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ठाण्याहून नाशिक, (पान ४ वर) (पान १ वरून) भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी आनंदनगर तसेच घोडबंदर मार्गावरील मानपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

 या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने वाहनाने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. महापालिका, राज्य परिवहन सेवेच्या बसगाडय़ा, खासगी शाळेच्या बसगाडय़ा, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेची वाहनेही या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होती.

ठाणे वाहूतक पोलिसांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी ६ नंतर घोडबंदर आणि ठाणे ते नाशिक मार्गिकेची वाहतूक पूर्ववत झाली. परंतु भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी कायम होती. मुंबई-नाशिक महामार्गिकेसह काल्हेर, कशेळी या भागातही पडलेल्या खड्डय़ांमुळे कशेळी ते कामतघपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्डय़ामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, याबाबत शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना विचारणा केली. रस्त्यावरील खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची कानउघाडणी केली. अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

तीन दिवस मुसळधारांचे

मुंबई, ठाण्यात बुधवारीही दमदार पाऊस झाला़  सखल भाग जलमय झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली, तर रेल्वेचाही वेग मंदावला. बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत (गेल्या २४ तासांत) सातांक्रूझमध्ये १९३.६ मिमी., कुलाब्यात ८४ मिमी. पावसाची नोंद झाली. मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये गुरुवारपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आह़े

सात दिवसांत.. मुरबाडमध्ये खड्डय़ांमुळे दुचाकीवरून पडून शनिवारी एका दूधविक्रेत्याला प्राण गमवावा लागला़  त्यापाठोपाठ घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्डय़ामुळे मोहनिश खान (३७) या दुचाकीस्वाराचा मंगळवारी मृत्यू झाला़  बुधवारी कल्याणमधील टिळक चौकात खड्डय़ामध्ये पाय घसरून दोन जेष्ठ नागरिकांना दुखापत झाली. दुसरीकडे, डोंबिवली पूर्वेतील सागर्ली गावात इमारतीला उद्वाहनाची सुविधा देण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून वेदांत जाधव या सहा वर्षांच्या मुलाला मंगळवारी प्राण गमवावा लागला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on mumbai and thane road due to heavy rain zws
First published on: 07-07-2022 at 05:51 IST