ठाणे : मुंबईतील नोकरदार प्रवाशांची जीवन वाहिनी म्हणून उपनगरीय रेल्वे गाड्यांकडे पाहिले जाते. परंतु आता या उपनगरीय रेल्वे गाड्यांवर अर्थात लोकलवरील जाहिरातीचा वाद चर्चेचा विषय झाला आहे. मध्य रेल्वेच्या गाडीवर लैंगिकतेसंदर्भात पाॅवर कॅप्सूलची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रवासी संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने कमरेचे डोक्याला गुंडाळले अशी संतप्त टीका रेल्वे संघटनेकडून केली जात आहे. संघटनेने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक इ-मेल पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वे मार्ग मुंबईकर नोकरदार आणि प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. लाखो नोकरदार या रेल्वेगाड्यांतून प्रवास करतात. अनेकदा रेल्वेगाड्यांवर अधिकृत जाहिराती चिटकविल्या जातात. त्यातून रेल्वेला उत्पन्न देखील मिळत असते. परंतु एका जाहिरातीवरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारण ही जाहिरात पाॅवर कॅप्सूलची आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून संताप व्यक्त केला जात असल्याने आता जाहिरातीमुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे मंत्र्यांनाच जाब विचारला आहे.
प्रकरण काय आणि संघटनेचे म्हणणे काय आहे जाणूया….
सध्या मुंबई उपनगरीय लोकल सेवा मध्य रेल्वेमधील सावळा गोंधळ वाढला असून बहुधा रेल्वे अधिकाऱ्यांना ना मंत्र्याचा वा लोकप्रतिनिधीचा धाक उरला आहे अशा रोज घडत असलेल्या घटनेवरून समोर येतेय यातच आता हिडीस जाहिराती लोकल डब्यांना लावण्याची मजल गेली आहे. त्यामुळे मुंबई रेल्वे अधिकाऱ्यांनी केवळ महसूल गोळा करण्याच्या नादात नेमके कमरेचे गुंडाळून डोक्यावर बांधले आहे काय? असा प्रश्न संघटनेने केला.
बुधवारी सायंकाळी कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेन कसारा स्थानकात आली असता लोकल डब्यावर जाहिरातीचे पोस्टर संघटनेचे कसारा प्रतिनिधी युवराज पंडित यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांना पाठविले. ही बाब श्याम उबाळे यांनी विभागीय व्यवस्थापक, वाणिज्य व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून नाराजी व्यक्त केली. लोकल ट्रेन मध्ये विद्यार्थी, महिला भगिनीं वृद्ध नागरिक सह सुसंस्कृत प्रवासी प्रवास करतात. संबधित रेल्वे अधिकारी आणि सदरहून ठेकेदार यांनी तारतम्य बाळगायला हवे.
केवळ जाहिरातीतून पैसे कमाविन्याकरिता मनाची लाज सोडली तरीही किमान जनाची लाज बाळगून या अशा हिडीस जाहिराती लावायला नको होत्या. त्यामुळे यात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी अशी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची भूमिका रेल्वे मंत्र्यांना निवदनातून कळविली असल्याचे मत श्याम उबाळे यांनी व्यक्त केले आहे.
