डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकातून आयरे गाव परिसराला करण्यात येणाऱ्या भूमिगत वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने आज (गुरुवार) सकाळी आयरेगाव, म्हात्रेनगर परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. खंडित वीज पुरवठ्याचा सुमारे नऊ हजार ग्राहकांना फटका बसला, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बाजीप्रभू चौकातील वीज उपकेंद्रातून आयरेगाव परिसराला वीज पुरवठा केला जातो. या भूमिगत वीज वाहिनीत आयरे जवळ सकाळी बिघाड झाला. हा बिघाड दुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांनी दुरुस्त केला. या भागातील काही भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर याच भागात पुन्हा दुसऱ्या भूमिगत वाहिनीत बिघाड झाला. पाठोपाठ दुसरा बिघाड झाल्याने आयरे परिसरातील सुमारे नऊ हजार वीज ग्राहकांना खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसला.




कडक उन्हाचे दिवस त्यात वीज बंद असल्याने रहिवाशांचे हाल झाले. घरातून कार्यालयीन काम करणाऱ्यांचे हाल झाले. इनव्हर्टर्सचे चार्जिंग संपल्याने ती बंद पडली. दुसरीकडे खराब वीज वाहिनी दुरुस्तीचे काम रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होते.
त्यामुळे आयरे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला –
”आयरेगाव परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या भूमिगत वीज वाहिनीत सकाळी बिघाड झाला. दुपारी वीज पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर अन्य वाहिनीत बिघाड झाला त्यामुळे आयरे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हे काम रात्री ९ वाजेपर्यंत पूर्ण केले.” अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली.
कल्याण पश्चिममध्ये उद्या वीजपुरवठा बंद राहणार-
कल्याण पश्चिमेतील मोहने आणि बारावे येथील उच्चदाब वीज वाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येत असल्याने उद्या (शुक्रवार) सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या दोन्ही वाहिन्यांवरून वीजपुरवठा होणाऱ्या भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली.
वीजपुरवठा बंद राहणार असलेले भाग –
अटळी, मोहने, आंबिवली, मांडा, मोहने गाव, गाळेगाव, जेतवन नगर, फुलेनगर, सहकारनगर, एनआरसी वसाहत, धम्मदीपनगर, बिर्ला महाविद्यालय रस्ता, संदीप हॉटेल परिसर, भोईरवाडी, आरटीओ कार्यालय, मिलिंदनगर, पालिका ब प्रभाग कार्यालय, कोकणरत्न हॉटेल परिसर, गगनगिरी सोसायटी परिसर.