पर्यावरण शिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर आवश्यक

भारतातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय पुस्तकातून शिकवण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रात्यक्षिकांद्वारे शिकविणे गरजेचे आहे,

भारतातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय पुस्तकातून शिकवण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रात्यक्षिकांद्वारे शिकविणे गरजेचे आहे, असे मत पद्मश्री पुरस्कारप्राप्त जादव पायेंग यांनी कल्याणात व्यक्त केले. प्रात्यक्षिकांद्वारे पर्यावरण शिक्षण दिले तरच लहानपणापासून मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

सुभेदार वाडा शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सुभेदार वाडा कट्टय़ाची निर्मिती केली होती. या कट्टय़ावरील पहिल्याच कार्यक्रमात जादव पायेंग यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक सी. एम. पुराणिक आणि पायेंग यांचे काम प्रकाशझोतात आणणारे आसामचे पत्रकार जितू कलिता आदी मान्यवर उपस्थित होते. जादव पायेंग आणि पत्रकार जितू कलिता यांच्याशी मिलिंद भागवत यांनी संवाद साधला. तीस वर्षांहून अधिक काळ जंगलात वास्तव्य करणाऱ्या या व्यक्तीची अद्भुत कथा प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात ऐकण्यास कल्याणकरांसोबतच ठाणे, पुणे, नाशिक येथील पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

आसाम सरकारकडून दुर्लक्षित
पद्मश्री पुरस्कारप्राप्त जादव पायेंग आजही छोटय़ा घरात राहतात. आपल्या सायकलवर झाडे त्याचप्रमाणे वृक्षलागवडीसाठी लागणारी अवजारे घेऊन पायेंग लांब पल्ल्याचा प्रवास करून वृक्षलागवड करतात, असा खुलासा पत्रकार जितू कलिता यांनी या वेळी केला. मागील तीन वर्षांपासून त्यांना विविध पुरस्कार मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र आसाम सरकारदरबारी ते दुर्लक्षित आहेत, असे कलिता यांनी सांगितले.

पायेंग म्हणाले..
आखाती देशातील नागरिक माझ्याकडे येतात आणि त्यांच्याकडे पर्यावरणविषयक काही उपक्रम राबवावा, असे सांगतात. मात्र त्यांच्याकडे पैसा असला तरी जागा नाही. त्यामुळे त्या ठिकाणी काही उपक्रम करणे शक्य नसते. मात्र आपल्या देशात जागा मुबलक असल्याने आपण जमिनीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे आहे.

मी जे काम करीत आहे, तेच काम माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे.आसाममध्ये एप्रिल, मे आणि जून हा काळ पावसाचा असून वृक्षवाढीसाठी हा काळ पोषक असतो. त्यामुळे या काळात मी कुठेही जात नाही परंतु सुभेदार वाडा कट्टय़ाच्या कार्यक्रमासाठी येण्याचे मान्य केले.

वृक्षलागवडीची शपथ
पायेंग यांच्या हस्ते सुभेदारवाडा शाळेच्या आवारात दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या घरात किमान दोन झाडे लावावीत आणि पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध राहावे, अशी शपथ या वेळी उपस्थितांनी घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Practical education is very important while learning environment studies says jadav payeng

ताज्या बातम्या