कोडग्या व कोरडय़ा व्यावहारिकतेची झाडाझडती

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
light pollution effect on human health
अंधेरा कायम रहे!!
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर

आयुष्यातील कोणतेही महत्त्वाचे निर्णय भावनांच्या आहारी जाऊन घेऊ नयेत, हे जितके बरोबर तितकेच सर्व ठिकाणी कोरडा व्यवहारही चालत नाही हे देखील खरेच. मात्र तात्कालिक फायदे लक्षात घेऊन हल्ली अनेकदा भावना पायदळी तुडविल्या जातात. रक्ताच्या नात्यांमधील जिव्हाळाच त्यामुळे धोक्यात येतो. साता समुद्रापार गेलेली पाखरं देशातल्या सग्यांना भेटीनाशी होतात. ‘प्रॅक्टिकल’मध्ये या भावनाशून्य जीवनशैलीचे दर्शन घडते..

काळे काकांचं आणि त्यांच्या बायकोचं त्यांच्या मुलांवर भरपूर प्रेम होतं. काकांची फक्त दोनच स्वप्नं होती- ती म्हणजे, आपल्या मुलाला कधीतरी अमेरिकेला पाठवायचं आणि दुसरं, आपल्या मुलीला डॉक्टर करायचं. आयुष्यभर कटकसर करून काकांनी पैसे जमवले व मुलगा केदारला अमेरिकेला पाठवलं. पण मग मुलीच्या शिक्षणाचं काय? हा विचार मनात येताच काकांनी त्यांचं घर गहाण ठेऊन गौरीच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या  पैशाची तरतूद केली. शेवटी केदार लग्न करून अमेरिकेत शिफ्ट झाला व गौरी डॉक्टर होऊन तिच्या नवऱ्यासोबत बंगळुरला सेटल झाली. दोघं भाऊबहीण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त झाले की त्यांना आईबाबांकडे पाहण्यासाठी वेळचं मिळेनासा झाला. काळे काका आणि काकू दिवसेंदिवस अधिकाधिक वृद्ध होत होते. त्यामुळे अखेरीस त्यांनी वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.

एक दिवस अचानक सकाळी तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने काळे काकूंचे निधन होते. वृद्धाश्रमाचा केअर टेकर राणे हा काकांच्या मुलामुलींना फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण मुलाचा फोन लागत नाही आणि मुलगी फोन उचलत नाही. काकांना हे कळल्यानंतर ते पुन्हा प्रयत्न करायला सांगतात. काकांना विश्वास असतो की काहीही झालं तरी ही धक्कादायक बातमी कळताच मुले तात्काळ मुंबईला निघून येतील. अखेर त्या दोघांचा संपर्क होतो. त्यांना ही दु:खद घटना कळवली जाते. मात्र अनुभव भलताच येतो.   . केदारची बायको त्याला समजावू लागते की तुझं आत्ता लगेच मुंबईला जाणं प्रॅक्टिकली योग्य नाही. दुसऱ्या बाजूला गौरीचा नवराही तिला तसाच सल्ला देतो. दोघेही राणेंना फोन करून त्यांच्याकडे लगेच येण्याबाबत असमर्थता व्यक्त करतात. हे ऐकून काळे काकांना काय वाटतं ? अशा परिस्थितीत  काळे काकांची साथ कोण देतं? काळे काकींना अग्नी कोण देतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लघुपटाच्या शेवटी आपल्याला मिळतात.

गेल्या सहा वर्षांपासून मयूरेश वाघ हा मालिका, सिनेमा आणि नाटकांमधे सहदिग्दर्शक म्हणून काम करीत होता. त्याला दिग्दर्शक म्हणून पदार्पण करायचे होते, पण संधी मिळत नव्हती. त्यामुळे  दिग्दर्शनाची सुरुवात एका लघुचित्रपटापासून व्हावी असं त्याला वाटलं. मनात ही गोष्ट येताच त्याने स्क्रिप्ट शोधायला सुरुवात केली. त्यासाठी त्याला फार शोधाशोध करावी लागली नाही. कारण लेखक त्याच्या अगदी जवळचे आणि परिचयाचे होते. या लघुपटाचे लेखक आनंद म्हसवेकर. नाटकाच्या प्रयोगासाठी औरंगाबादला गेले असताना एक प्रयोग एका वृद्धाश्रमात विनामूल्य करतात. त्या प्रयोगाच्या निमित्ताने तिथल्या वृद्धांचा आणि त्यांच्या दु:खांचा त्यांना परिचय झाला. तिथल्या केअर टेकरबरोबर बोलत असताना त्याने एक धक्कादायक सत्य सांगितले. इथे ज्या काही वृद्धांचे मृत्यू होतात, त्यापैकी पन्नास टक्के वृद्धांची मुले त्यांचे अंत्यविधीसुद्धा घरी नेऊन करत नाहीत. ते अंत्यविधीसाठी इथे येतही नाहीत. मग तिथला केअर टेकर त्यांचे अंत्यविधी इतर वृद्धांच्या सहाय्याने करतो. हे सत्य ऐकून त्यांच्या मनात हा लघुपट आकार घेऊ  लागला. मयूरेशने त्यांना कॉल केल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मयूरेशला घरी बोलवलं आणि एक कथा ऐकवली. त्या कथेचं नाव होतं ‘प्रॅक्टिकल’. त्यांनी आत्तापर्यंत अनेक गाजलेली नाटके लिहिली, सिनेमे लिहिले, कथा लिहिल्या; पण लघुचित्रपट कधीच लिहिला नव्हता. ‘प्रॅक्टिकल’च्या निमित्ताने त्यांनी पहिलाच लघुचित्रपट लिहिला. ती कथा इतकी सहज आणि स्पष्ट होती की एक दिग्दर्शक म्हणून मयूरेशला त्यात काही बदल करायची गरजच पडली नाही. इथून त्याच्या मोठय़ा कामाला सुरुवात होणार होती ती म्हणजे कथेतल्या पात्रांची निवड आणि आर्थिक तरतूद. जानेवारी महिन्यात बार्शीमध्ये झालेल्या एका एकांकिका स्पर्धेत मयूरेशची ओळख दिशा थिएटर्सचे प्रमुख दीपक नलावडे यांच्याशी झाली होती. तेव्हा तो दिलीप नलावडे यांना फार ओळखतही नव्हता. पण तेवढय़ाच एका ओळखीवर दीपक नलावडेंना मयूरेशने या चित्रपटाची निर्मिती करण्याबद्दल विचारलं. कुठलाही प्रश्न न विचारता आणि कथा काय आहे हे माहीत नसतानाही त्यांनी एका शब्दावर मयूरेशला होकार दिला. चंद्रशेखर भिडे यांच्या बदलापूरमधील ‘सहवास’ या वृद्धाश्रमात चित्रीकरण होईल असं ठरवण्यात आलं. तिथे ४० ते ४५ आजी आजोबा राहात होते. त्या सगळ्यांनी सगळ्या कलाकारांचं स्वागत केलं. तिथे मोलाची मदत झाली ती व्यवस्थापक जोशी सर यांची.

जयंत घाटे यांची वडिलांच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली पण आईची भूमिकेची निवड झाली नव्हती. कारण दिग्दर्शकाला हवी असलेली आई मिळत नव्हती. ऐश्वर्या चव्हाण ही मयूरेशची मैत्रीण. तिने तिच्या आईचं नाव सुचवलं. त्यांचे नाव पद्मा चव्हाण. पद्मा मॅडम कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात व त्यांनी याआधी कधीही अभिनय केला नव्हता. लहानपणी बालनाटय़ातून काम केलेल्या आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ऐश्वर्यासुद्धा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर अभिनय करणार होती. वृद्धाश्रमाच्या केअर टेकरची भूमिका करणारा सौरभ पात्रुडकर हा माझा मयूरेशचा मित्र. सौरभला अभिनय करायची खूप इच्छा होती, पण त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ‘प्रॅक्टिकल’मध्ये सर्वात आधी जर कुणाची निवड झाली असेल तर ती सौरभचीच. डॉक्टर जावयाची भूमिका करणारा सूरज पवार हा मयूरेशचा शाळेपासूनचा मित्र. या दोघांनी नाटकांमध्ये एकत्र कामं केली होती आणि त्याने हा लघुपट करण्यास होकार दिला. गौरी भिडेची डॉक्टर गौरीच्या भूमिकेसाठी निवड केली. वृद्धाश्रमातल्या डॉक्टरची भूमिका अगदी लहान पण महत्त्वाची होती. वृद्धांबद्दलची काळजी आणि सेवावृत्ती त्यांच्या हावभावातून दिसणे आवश्यक होते. किरण राजपूतने डॉक्टरची भूमिका पार पाडली. चित्रीकरणाच्या  दुसऱ्या दिवशी केदारची भूमिका करणाऱ्या अमेय बाणेची दहा मिनिटे आधी निवड झाली. अभिनय कधीच केला नसल्यामुळे तो जरा जास्तच घाबरलेला होता, पण त्याने भूमिकेची योग्य पाश्र्वभूमी ओळखून तो काम करू लागला. सिद्धेश गिरी आणि कुणाल मोहिते यांनी छायाचित्रण केले. चैतन्य भिसे यांनी संकलन केले. त्याला योग्य साथ मिळाली ती संगीत आणि पाश्र्वसंगीतकार अमित पाध्ये आणि ओंकार मुंडये यांची. चित्रीकरणाच्या वेळापत्रकापासून ते थेट फिल्म फेस्टिव्हलपर्यंत सहाय्यक दिग्दर्शक हर्षल फडकेचे काम संपत नाही. श्रीराज भिडे कुठेच दिसत नसला तरी त्याच्यावर प्रॉडक्शन सांभाळण्याची मोठी जबाबदारी होती. वर्षां सानप हिने वेशभूषाकार तसेच केदार ओटवणेकर याने रंगभूषाकार म्हणून कामगिरी केली. एका दिवसात काम पूर्ण करायचं होतं. त्यामुळे वेळ कमी होता. पूर्ण दिवस छान शूट झाल्यानंतर फक्त स्मशानात आगीचा एक सीन शूट करायचा होता. पण मुख्य संकट असे उभे राहिले की आग पेटत नव्हती. चिता जळताना दाखवायची होती. तिथे जायला वेळ लागला आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. हवा इतकी होती की कागदही पेट घेत नव्हता. बाईकच्या टाकीतील पेट्रोलमध्ये कापडाचा बोळा भिजवून पेटविण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर पालापाचोळा पेटवून आग दाखवली आणि मनासारखा शॉट घेऊन लघुपट पूर्ण झाला.

शिक्षण आणि नोकरीसाठी आई वडिलांना सोडून परदेशात राहणाऱ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची हे पुढचं मुख्य लक्ष्य आहे. लघुचित्रपटांमधून जर चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचत असेल आणि त्याने बदल घडायला मदत होत असेल तर दिशा थिएटर्स नक्कीच गरजू आणि नवीन विषयांवर भविष्यातही लघुचित्रपट निर्माण करत राहणार आहे.