ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर तब्बल २४ तास उलटल्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या अत्यंयात्रेला शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रदीप पूर्णेकर यांच्या अत्यंयात्रे दरम्यान अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर काहीजणांनी पोरकेपणाची भावना व्यक्त केली.
मानपाडा येथील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हे मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या व त्यानंतर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हत्येची बातमी कळताच, त्यांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी रुग्णालय परिसरात धाव घेतली. घोडबंदर मार्गालगत हे रुग्णालय असल्याने महामार्गावर मोठी गर्दी जमली. रात्री उशिरापर्यंत जमाव कायम राहिल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. बुधवारी पहाटे त्यांचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात नेण्यात आला. बुधवारी मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदविला. परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
परिसरात ठिकठिकाणी पूर्णेकर यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. तसेच परिसरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि समर्थकांनी दुपारी कापूरबावडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यात पुर्णेकर यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी दुपारी पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलीस ठाण्याजवळ आणल्यानंतर समर्थकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी रुग्णवाहिका पोलिस ठाण्याच्या आवारात सोडण्यास मनाई केली. यामुळे समर्थक आक्रमक झाले. गर्दीमुळे कापूरबावडी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे. मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर परिसर व पोलीस ठाण्याच्या परिसरात सुमारे ४०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचे नाव सहभागी करण्यात आले. बुधवारी रात्री उशीरा प्रदीप यांचा मृतदेह मानपाडा येथील गणेशनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. यावेळी सर्वत्र शोक आणि दु:ख व्यक्त केले जात होते. हत्येच्या २४ तासानंतर रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्य यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांचे अश्रूंचे बांध फुटले. तर काहींना आपला बाळू दादा (प्रदीप पूर्णेकर) आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नव्हता.
