ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांची हत्या राजकीय असून, या प्रकरणात आरोपी आणि सूत्रधारांना का वाचवले जात आहे, असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला. पूर्णेकर कुटुंबीय गेल्या महिनाभरापासून न्यायासाठी लढत आहे. हत्येतील आरोपींची सीसीटीव्ही चित्रफीत उपलब्ध असतानाही कारवाई का होत नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोपींना आणि सूत्रधारांना का वाचवत आहेत, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. न्याय न मिळाल्यास ठाण्यात महामोर्चा काढावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, पूर्वी गुन्हेगारीचे उदाहरण देताना बिहारचा उल्लेख केला जात होता. मात्र, आता बिहारची परिस्थिती ठाण्यापेक्षा चांगली असल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मानपाडा येथील निवासस्थानी जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला. सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले.

प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ते न्याय मागण्यासाठी गेले होते, ते काही गुंड नव्हते. पालकमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असताना ते राम पूर्णेकर यांना का घाबरले, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. राजकीय हत्या होत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पोलीस आयुक्तांची भेट घेऊनही तपासाबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गृहमंत्री केवळ पक्ष फोडण्यात आणि वृक्षतोड करण्यात गुंतले आहेत, अशी टीका करत माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर का केला जात आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. हत्येतील सूत्रधारांना वाचवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का आहेत? ते केवळ सह्याद्री तोडण्यात गुंतले आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

चौकट महाराष्ट्राच्या इतिहासात इतका दुर्बल मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नाही. ठाण्याची परिस्थिती बीडपेक्षाही वाईट आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक केल्याशिवाय हत्येमागील मुख्य हेतू स्पष्ट होणार नाही, असे ते म्हणाले. पोलीस आयुक्तांसोबत चर्चा सुरू असताना त्यांना दोन वेळा कोणाचा तरी दूरध्वनी आला. त्यावेळी ते अस्वस्थ झाल्याचे दिसत होते. हा दूरध्वनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, असा संशय त्यांच्या देहबोलीवरून आल्याचे राऊत म्हणाले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करणार का, असे विचारले असता, ‘सीबीआय अमित शहा यांच्याकडे आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले.

चौकट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विश्रामगृह परिसरात जमले. त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आमदार रवींद्र फाटक, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि नगरसेवक मनोज शिंदे हेही विश्रामगृहात उपस्थित होते. त्यानंतर माजी खासदार तथा प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करून आनंद आश्रमात परतण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी परिसर रिकामा केला.

शिंदे गटाने गुरुवारी दुपारी मुंबई आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना टेंभीनाका येथे जमण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तालयापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत चालत जात शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या राजकीय शक्तिप्रदर्शनामुळे ठाणे शहरातील विविध भागांत वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.