ठाणे : ठाणे शहरात प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडप्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करावी अशी मागणी करण्यासाठी आज, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी टेंभीनाका परिसरात जमा झाले. तर ठाकरे सेना, मनसेचे पदाधिकारी देखील मोठ्याप्रमाणात जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची महिनाभरापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या वक्तव्यांच्या निषेधार्थ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे आणि मुंबईतील शिवसैनिकांना गुरुवारी टेंभीनाका येथे जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विविध भागांतून शिवसैनिक, आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी गुरुवारी दुपारी टेंभीनाका परिसरात दाखल झाले. या गर्दीचा परिणाम आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला होता.
दरम्यान, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गट, मनसेचे शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले होते. पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे राम पूर्णेकर यांना घेऊन पोलीस आयुक्तांना भेटले. तसेच, कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करत पोलीस आयुक्तालय ते ठाणे शासकीय विश्रामगृहापर्यंत चालत पत्रकार परिषदेसाठी गेले. शिंदे गटाचे पदाधिकारी देखील विश्राम गृहापासून अवघ्या दोन मिनीटांवरील टेंभीनाका येथे जमले होते. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
