ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर रविवारी सकाळी आगरी-कोळी समाजाचा पूर्णेकर यांचे निवासस्थान ते कापूरबावडी पोलीस ठाणे पर्यंत मोर्चा निघणार आहे. पूर्णेकर हे आगरी समाजाचे असून त्यांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला जात आहे.

घोडबंदर येथील मनोरमानगर, आझादनगर आणि मानपाडा भागातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. मानपाडा भागातील माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे प्रदीप पूर्णेकर हे भाऊ आहेत.

प्रदीप पूर्णेकर हे नशामुक्ती सह पोलिसांच्या विविध उपक्रमात सहभागी होत असे. समाजमाध्यमाद्वारे त्यांनी अनेक सामाजिक विषयांसाठी आवाज उठविला. काॅक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुकारलेल्या आंदोलनामध्येही त्यांनी दिल्ली येथे जाऊन सहभाग घेतला होता. नुकत्याच ठाणे महापालिका निवडणूकीत त्यांची पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या.

पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांना आतापर्यंत पाच हल्लेखोरांपैकी तिघांना अटक केली आहे. तर चार दिवस उलटूनही इतर दोघांचा शोध पोलिसांना लागला नाही. प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा आणि हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हे आगरी समाजाचे होते. त्यामुळे रविवारी पूर्णेकर यांना न्याय मिळावा यासाठी मानपाडा येथील पूर्णेकर यांचे निवासस्थान ते कापूरबावडी पोलीस ठाण्यापर्यंत आगरी-कोळी समाजाचा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज सहभागी होणार आहे. दरम्यान, मोर्चा निघणार असल्याने ठाणे पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त लागू केला जाणार आहे.