कल्याण : ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणावरून खासदार नरेश म्हस्के यांनी शिंदे शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांवर कठोर शब्दांत प्रहार केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याणमधील नेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी म्हस्के यांना ‘तुम्ही फक्त पोलीस संरक्षण काढून कोठे व कधी भेटायचे तेवढे सांगा,’ असे खुले आव्हान दिले तर युतीधर्म बाजूला ठेवून डोंबिवलीतील भाजपचे नगसेवक दीपेश म्हात्रे यांनी नरेश म्हस्के यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य, त्या कुटुंबीयांची अवस्था बघून जरा भान ठेऊन बोलण्याची समज दिली आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. पूर्णेकर कुटुंबीयांच्या हत्येवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गट, काँग्रेस यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी शिंदे शिवसेनेतील आमदार, खासदार व तगडी फळी रस्त्यावर उतरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी ठाण्यात येऊन अद्वातद्वा बोलला तर तुम्हाला सुखासुखी परत जाऊ दिले जाणार नाही, असा कडक शब्दांतील इशारा म्हस्के यांनी विरोधकांना दिल्याने विरोधकांनीही तेवढ्याच आक्रमकपणे शिंदे शिवसेना व विशेषता खासदार नरेश म्हस्के यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणाला आतापर्यंत राजकीय वळण मिळाले होते. आता त्याला आगरी-कोळी असे जातीय वळण मिळत चालल्याने राजकीय भेद विसरून पूर्णेकर कुटुंबीयांना साथ देण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील मंडळी आता व्यक्तिशा म्हस्के यांच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत.
बंड्या साळवींचे आव्हान
खासदार नरेश म्हस्के यांनी पोलीस संरक्षण काढावे व आम्हाला वेळ व कुठे भेटायचे तेवढे कळवावे. नरेश म्हस्के यांच्या व्यक्तिगत विखारी टीका करीत ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी समाजमाध्यमांतील एका पत्रकात म्हटले आहे, की नरेश म्हस्के एका बापाचा असेल त त्याने आगरी कोळी समाजासमोर पोलीस संरक्षणाशिवाय येऊन दाखवावे.
अपघाती खासदार
पूर्णेकर कुटुंबीय घरातील कर्ता माणूस गेल्याने शोकसागरात आहे. अशा स्थितीत खा. नरेश म्हस्के शिंदे शिवसेनेवर विरोधकांकडून या हत्येप्रकरणी होत असलेल्या आरोपांमुळे आक्रमक होत उत्तर देत असल्याने ठाकरे गटासह आता भाजपमधील काही मंडळी म्हस्के यांना भानावर येण्याची सूचना करीत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेतील भाजपचे नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी समाज माध्यमांत म्हटले आहे, की पूर्णेकर कुटुंबीयांवर कोणते संकट ओढावले आहे याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. काही लोकांना झोपता उठता राजकारण दिसले. अपघाताने झालेले खासदार नरेश म्हस्के आपण आपल्या बोलण्यावर भान ठेवावे.
शिवसेना पाठीशी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिंदे शिवसेना यापूर्वी होती. आताही आहे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुर्णेकर कुटुंबीयांना आता आधाराची गरज आहे. अशापरिस्थितीत विरोधी पक्षाचे लोक या सर्व प्रकरणात चुकीचे राजकारण करत आहेत, अशी टीका शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत गुरूवारी केली. याप्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा आ. मोरे यांनी दिला.
