ठाणे : प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद असून, या घटनेचे राजकीय भांडवल करणे त्याहूनही अधिक दुर्दैवी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. पुर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात शिवसेना सहभागी असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर या घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः ठाणे पोलीस आयुक्तांना दूरध्वनी करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले होते, असेही शिंदे यांनी सांगितले.

शिवसेना ( ठाकरे ) गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाणे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे. असे असतानाचा या प्रकरणाशी वारंवार नाव जोडले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आपल्याकडे पाठवला असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पुर्णेकर यांच्या हत्येच्या दुर्दैवी घटनेशी आपले नाव वारंवार जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याची भावना त्यांनी राजीनाम्यात व्यक्त केली आहे. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

“घटना घडल्याच्या पहिल्याच दिवशी मी स्वतः पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे झाला पाहिजे, असे सांगितले. कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही,” असे शिंदे म्हणाले. त्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव आणण्याऐवजी पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे आणि जनतेनेही संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. पुर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य करताना शिंदे यांनी काही घटनांबाबत नाराजी व्यक्त केली. बाहेरून येणाऱ्या काही लोकांकडून ठाणेकरांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जाळपोळ करणे, महामार्ग बंद करणे, नौपाडा परिसरात पोलिसांवर दगडफेक करणे आणि त्यात पोलिस जखमी होणे, अशा प्रकारांमुळे शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचत असल्याचे ते म्हणाले. ठाणेकरांच्या शांततेला धक्का लागू दिला जाणार नाही. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही सरकारची जबाबदारी असून, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या भूमिकेबाबतही शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शिवसेना कायम युतीधर्माचे पालन करत आली असून, युतीधर्म पाळला गेला पाहिजे, ही पक्षाची भूमिका आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. युतीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्या, तरी शिवसेनेने या निवडणुकीत युतीधर्माचे पालन केले आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.