ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर होत असलेल्या आरोपांवर माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप थांबवा. एखाद्यासह फोटो म्हणजे गुन्हेगारी संबंधांचा पुरावा नाही. पोलिसांच्या तपासातूनच या हत्येमागचे सत्य समोर येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मी पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना शिंदे शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, गदारोळ सुरू असताना समोर येणे योग्य नाही. एका कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होऊ द्यावा. पोलिस तपासात जे सत्य समोर येईल, त्यानुसारच पुढील भाष्य करेन, असे ठरविले होते.
मी ज्या प्रभागातून निवडून आले, तेथील प्रत्येक व्यक्तीशी मी संवाद साधत असते. केवळ एखाद्यासह फोटो म्हणजे त्याच्याशी गुन्हेगारी संबंध असल्याचा पुरावा होत नाही. समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या काही चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर तयार केल्या गेल्या आहेत, असे सांगितले जात आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध आहे की नाही, हे तपासातून स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र शिंदे आरोपीच्या संपर्कात होते, असे भाष्य करणे योग्य नाही. पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच याबाबत बोलेन, असे त्यांनी सांगितले. माझा आरोपी म्हणून उल्लेख नाही. केवळ संजय राऊत वा आदित्य ठाकरे यांनी माझे नाव घेतले म्हणून मी आरोपी ठरत नाही, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, चौकशीला सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मुलाला राजकारणात ओढणे चुकीचे’
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या आरोपांवरही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. लहान मुलाला अशा पद्धतीने राजकारणात ओढणे योग्य नाही. त्याला काय सांगितले जात आहे, याचाही विचार करायला हवा, असे त्या म्हणाल्या. परिसरात राहणाऱ्या लावण्या हिचा अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंध असल्याच्या संशयावरून पूर्णेकर यांनी तिला मारहाण केली होती. याबाबत पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या मारहाणीनंतर तिने पूर्णेकर यांना मारण्याची धमकी दिल्याचा जबाब पूर्णेकर यांच्या मुलाने दिला आहे. त्यामुळे पोलिस या दिशेनेही तपास करीत आहेत. या प्रकरणातील सत्य तपासानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
‘क्लस्टरसाठी आम्हीही लढलो’ क्लस्टरच्या मुद्द्यावरूनही शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. क्लस्टरसाठी आम्ही लढा देत होतो. मात्र, क्लस्टर व्हावे यासाठी प्रदीप पूर्णेकर यांनीही पुढाकार घेतला होता, असे त्या म्हणाल्या. मी विचारांची लढाई लढले आहे. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नेणे योग्य नाही. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, त्यामागे कोण होते, याची उत्तरे पोलिसांच्या तपासातूनच मिळतील. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सत्य समोर येण्याची प्रतीक्षा करावी, असे मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले.
