ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केले आहे. त्यानंतर पप्या शिंदेच्या आईने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलाची बाजू मांडली. “मला मारझोड झाली तरी चालेल, पण मी पूर्णेकरांच्या घरी जाणार,” असे सांगत पप्याचा या हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचा दावा तिने केला. पप्या हा प्रदीप पूर्णेकरांचा सच्चा कार्यकर्ता असून, त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आल्याचेही तिने म्हटले.
‘जखमी पूर्णेकरांना पप्याने रुग्णालयात नेले’
गोळीबार झाल्यानंतर जखमी प्रदीप पूर्णेकर यांना पप्याने उचलून रुग्णालयात नेल्याचा दावा त्याच्या आईने केला. “माझ्या मुलाने काही केले असते तर तो तिथून पळून गेला असता,” असे ती म्हणाली. गोळीबाराच्या वेळी अचानक समोर गोळ्या झाडल्या जात असताना कोणताही सामान्य माणूस घाबरेल; मात्र पप्याने जखमी पूर्णेकरांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले.
‘पप्प्याचा पूर्णेकरांशी जवळचा संबंध’
पप्या निर्दोष असल्याचा दावा करताना त्याच्या आईने पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्याची इच्छाही व्यक्त केली. “मला मारझोड झाली तरी चालेल, मी पूर्णेकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणार कारण….पप्या शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर यांच्यात पूर्वीपासून जवळचे संबंध होते, असा दावाही त्याच्या आईने केला. दोन्ही कुटुंबांमध्ये घरगुती संबंध असल्याचे सांगताना गणपतीच्या काळात पूर्णेकर कुटुंबातील सदस्य त्यांच्या घरी येत असत, तसेच एकत्र जेवण आणि घरगुती कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे तिने सांगितले. “दादा दादाच बोलवत होतो. आम्हीही त्यांना दादा बोलतो. घरातल्यासारखे वातावरण होते,” असे ती म्हणाली. पप्या हा पूर्णेकरांचा सच्चा कार्यकर्ता असून, त्याच्यावर विनाकारण आरोप करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.
‘माझ्या मुलावर विनाकारण ठपका’
पप्याला न्यायालयात आणल्यानंतर तो रडत असल्याचेही आईने सांगितले. “माझ्या समोर दादाला गोळ्या घातल्या. दादाचा जीव गेला, त्याच्यासाठी मला वाईट वाटत आहे; पण कारण नसताना माझ्यावर ठपका बसला,” असे पप्याने आपल्याला सांगितल्याचा दावा तिने केला. ‘टल्ली’ नावाच्या व्यक्तीचा पप्या वारंवार उल्लेख करत असल्याचेही तिने सांगितले. “टल्ली सापडला ना, मी सुटतो,” असे पप्या आपल्याला म्हणाल्याचा दावा तिने केला.
