ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे गृहखाते आहे. खून आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात. महाराष्ट्र पोलिसांची एकेकाळी ख्याती होती; मात्र आता पोलिसांचा दरारा राहिलेला नाही. ज्यांच्यावर विश्वास नाही, अशा लोकांच्या ताब्यात सीआयडी, सीबीआय यंत्रणा आहेत. त्यामुळे नागरिकांनाच यंत्रणा ताब्यात घेऊन उठाव करावा लागेल, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा, आझादनगर आणि मनोरमानगर विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयातच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रविवारी मानपाडा येथे प्रदीप पूर्णेकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला आमदार भास्कर जाधव, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी दुकाने बंद ठेवून शोकसभेत सहभाग घेतला.
गेल्या आठ महिन्यांत ठाण्यात २० खून झाल्याची माहिती आहे. पोलीस ठाण्यात शिरून लोकांना मारले जात आहे. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत आहेत. सत्ताधारी रुग्णालयात काम करणाऱ्यांनाही मारत आहेत. ठाण्यात दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वसामान्यांना घरी बसविण्याचे हे षड्यंत्र आहे. गृहखाते काय करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी दोन-चार जणांना पकडले आणि आम्ही शांत झालो, असे होऊ नये. या प्रकरणातील खरे मारेकरी कोण आहेत आणि या मारेकऱ्यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांना फासावर लटकवेपर्यंत आमची जबाबदारी संपणार नाही, असेही जाधव म्हणाले. मला मिळालेल्या माहितीनुसार, या विभागात १७० एकर जागेवर क्लस्टर योजना राबविली जात आहे. या क्लस्टर प्रकल्पाचा फायदा केवळ बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या मागील ‘आकां’ना होऊ नये. या योजनेचा लाभ येथील नागरिकांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना मिळावा, यासाठी प्रदीप पूर्णेकर लढत होते. ठाणे शहर अमली पदार्थ तस्करांचा अड्डा बनल्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. अमली पदार्थांच्या विरोधातही पूर्णेकर लढत होते. तसेच, येथे निवडून आलेले मूळचे महाराष्ट्रातील नसून अन्य राज्यातील आहेत. त्यांच्या जातीच्या दाखल्यांबाबत संशय असून त्याची चौकशी झाली पाहिजे, यासाठी प्रदीप पूर्णेकर संघर्ष करत होते. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचा जातीचा दाखला चुकीचा असल्याचे सांगून त्यांचे नगरसेवकपद काढून घेण्यात आले. खून सोडा, कोणाच्या कानशिलात मारण्याचे काम आमच्याकडून झाले नाही. मात्र, कोणी बोगस कागदपत्रांची तपासणी करत असेल तर त्याला कायदेशीर उत्तर द्यायला हवे होते. तसे न करता त्यांचा ‘काटा काढायचा’, ही अत्यंत गंभीर बाब आहे. एका व्यक्तीचा खून म्हणजे लोकशाहीचा खून आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असेही जाधव यांनी सांगितले.
