ठाणे : मानपाड्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाल्यानंतर आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईक व समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला असतानाच, भाजपचे नेते व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देत सखोल चौकशी करून हत्येमागील हेतू व संपूर्ण वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणण्याची मागणी केली आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. हत्येचा तपास सुरू असतानाच आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईक व समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आहे. ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांना पत्र देत हत्येमागील हेतू, पार्श्वभूमी व संपूर्ण वस्तुस्थितीचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
प्रदीप पूर्णेकर हे ठाणे शहरातील सर्वसामान्य तसेच तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत होते. तसेच अमली पदार्थांविरोधात त्यांनी मोठी मोहीम राबवली होती. अनधिकृत बांधकामांविरोधातही त्यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे त्यांच्या हत्येप्रकरणी नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
