ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिघा आरोपींची समोरासमोर चौकशी केली. तसेच, एका १८ वर्षीय संशयित तरुणीलाही तपासासाठी बोलावण्यात आले. मात्र, चौकशीनंतरही पोलिसांच्या हाती इतर आरोपींबाबत ठोस माहिती मिळू शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाणे पोलिसांनी पप्या शिंदे, निखील यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक केली आहे. शनिवारी गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव आणि खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी तिघांची समोरासमोर चौकशी केली. सुमारे सहा तास चाललेल्या या चौकशीतही हत्याकांडासंदर्भात इतर आरोपींबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर तसेच हत्येनंतर पूर्णेकर यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्तींनाही पोलिसांनी तपासासाठी बोलावले होते. त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तसेच, एका १८ वर्षीय संशयित तरुणीलाही तपासासाठी पोलिसांनी बोलावले आहे.
नितेश पवार आणि निखील यादव या दोघांना पोलिसांनी कोठडीत नेत असताना त्यांची देहबोली अतिशय सामान्य असल्याचे दिसून आले. त्यांच्या शारीरिक हावभावावरून त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप जाणवत नसल्याचा दावा राम नाईक यांच्या सहकाऱ्यांनी केला.
