ठाणे – घोडबंदरच्या मानपाडा-मनोरमानगर भागातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेची कसून चौकशी केली जात आहे. तसेच याप्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींच्या परिचित दोन महिलांना पोलिसांनी बुधवारी रात्री मिरारोड येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. दरम्यान, हत्येवेळी हल्लेखोरांनी वापरलेल्या दोन दुचाकी वर्तकनगरच्या समतानगरातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकामार्फत आरोपींचा शोध, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि हत्येच्या कटामागील सूत्रधाराचा शोध घेत आहेत. पूर्णेकर यांच्या हत्येचा कट नेमका कोणी रचला, हल्लेखोरांना कोणाची मदत मिळाली, हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पथकाकडून केला जात आहे. हत्येपूर्वी आरोपींच्या हालचाली काय होत्या, त्यांना शस्त्रे कोणी उपलब्ध करून दिली तसेच हल्ल्यानंतर त्यांना कोणी मदत केली का, या दिशेनेही तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

हत्येवेळी हल्लेखोरांनी वापरलेल्या दोन दुचाकी वर्तकनगरच्या समतानगरातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हल्ल्यानंतर पसार होताना आरोपींनी या दुचाकींचा वापर केला आणि त्या समतानगर परिसरात सोडून तेथून पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यातील एक दुचाकी आरोपी निखिल यादव याची, तर दुसरी आरोपी नितेश पवार यांच्या भाच्याची असल्याचे तपासात समोर आले आहे. या दुचाकी सोडून आरोपी नेमके कुठे आणि कोणत्या वाहनाने पसार झाले, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील वाई भागातील मूळ रहिवासी असलेले ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांची काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील डायल ११२ येथे अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांची बदली रद्द करून त्यांच्याकडे पुन्हा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्याकडेच आता पुर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.