ठाणे : घोडबंदर येथील माजिवडा, मनोरमानगर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने याप्रकरणातील आणखी दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. आता याप्रकणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या तीन इतकी झाली आहे. या दोघांची हत्येतील नेमकी भूमिका आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

निखिल सुनील यादव (२७) आणि नितेश रमेश पवार (३७) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पप्या शिंदे याला अटक करण्यात आली होती. हत्या कोणत्या कारणामुळे झाली, याचा पोलीस शोध घेत असून त्यासाठी राजकीय, सामजिक आणि आर्थिक अशा सर्वच बाजूंनी पोलीस तपास करित आहेत. याप्रकरणाच्या तपासासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची गुरुवारी स्थापना केली.

दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, शुक्रवारी या पथकाने निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याजवळील परिसरातून अटक केली. यापूर्वी पप्या शिंदे याला अटक करण्यात आले असून, आरोपींची संख्या आता तीन इतकी झाली आहे. या दोघांची हत्या प्रकरणातील नेमकी भूमिका काय होती, तसेच या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पथकाकडून करण्यात येत आहे. तसेच उर्वरित फरार आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.

कोण आहेत निखील आणि नितेश?

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला निखिल सुनील यादव (२७) हा एमएसईबीमध्ये रीडिंगचे काम करतो. तो चितळसर-मानपाडा येथील चर्च रोड परिसरातील आदर्श चाळ क्रमांक दोन येथे राहतो. तर नितेश रमेश पवार (३७) हा बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून काम करतो. तो समतानगर येथील आकांक्षा चाळीत राहत होता. मागील सहा महिन्यांपासून तो लोकमान्यनगर परिसरातील आकृती सोसायटीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

गुन्हात सहभाग, वापरलेली शस्त्रे यांचा शोध सुरू

निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना कर्नाळा अभयारण्य परिसरातून अटक करण्यात आली आहे. या दोघांचा गुन्ह्यात नेमका सहभाग काय होता, आणखी कोणी या गुन्ह्यात सहभागी आहे का आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे कुठे आहेत, याचा तपास सुरू आहे. तपासानंतर या बाबी समोर येतील. तसेच, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.