ठाणे : ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगितले. हत्येतील सर्व आरोपींना अटक होऊन कठोर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचा शब्दही दिला. या भेटीनंतर ‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरी यावे, ही प्रदीप पूर्णेकर यांची इच्छा होती’, अशी भावना प्रदिप यांच्या पत्नी विजेता यांनी व्यक्त केली.
घोडबंदर येथील मानपाडा, मनोरमानगर भागातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी कुटूंबियांकडून होत असून यासाठी त्यांनी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्याच्या परिसरात ठिय्या मांडला होता. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जाऊन सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेतली होती.
हत्येचा निष्पक्ष तपास करून संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. पूर्णेकर कुटुंबीय दहशतीखाली असल्याने त्यांना सुरक्षा देण्याची मागणीही केली होती. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केलेल्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करून तपासाला योग्य दिशा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यापाठोपाठ ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगितले.
या हत्येतील एकही गुन्हेगार सुटता कामा नये. ज्याने कट रचला असेल, त्याचाही शोध घेतला जाईल. मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी कुटुंबीयांना दिली. दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांची भेट घेऊन बाहेर येत असताना निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिक आणि नागरिकांनी ‘प्रदीप पूर्णेकर यांना न्याय द्या’ अशा घोषणा दिल्या. ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधत पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
प्रदीप पूर्णेकर यांची इच्छा होती
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रदीप पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीनंतर प्रदीप यांच्या पत्नी विजेता या पत्रकारांशी बोलताना भावूक झाल्या. ‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरी यावे, ही प्रदीप पूर्णेकर यांची इच्छा होती’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
