ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पद्धतीने करून ‘सीबीआय’मार्फत आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे यांनी शनिवारी मानपाडा येथील निवासस्थानी जाऊन पूर्णेकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची भूमिका तपासली जावी. संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), आर्थिक व्यवहार आणि परस्पर संबंधांची चौकशी करावी, अशी मागणी अधारे यांनी केली.
पाच कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी या माहितीची सत्यता तपासावी, असेही त्या म्हणाल्या. पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वी पंधरा दिवस रेकी सुरू असल्याचा दावा करत अंधारे यांनी हॉटेल महाराजा येथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची मागणी केली. दोन आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात गंभीर आरोप आणि माहिती समोर येत आहे. तरीही पोलिस कारवाई का करीत नाहीत? पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का पाहत बसले आहेत? असा प्रश्न अंधारे यांनी केला.
