ठाणे : मानपाडा येथील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेसाठी पूर्णेकर यांच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले. या आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना प्रतिक्रिया देत आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.
मानपाडा येथील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक मंदार घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात पोलिसांनी पप्या शिंदे याला अटक केली आहे. या हत्येच्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून आणि समर्थकांकडून करण्यात येत आहे. प्रदिप यांचा मुलगा राम याने पत्रकार परिषद घेऊन तसा आरोपही केला. मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप त्याने केला आहे. तसेच पूर्णेकर यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिकाही पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पूर्णेकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.मात्र, पोलिसांनी पुरवणी जबाब घेत मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावाचा त्यात समावेश करत पुढील प्रक्रिया सुरु केल्यानंतर नातेवाईकांनी पूर्णेकर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अत्यसंस्कार केले.
या आरोपांवर मीनाक्षी शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. या तपासातून जे काही निष्पन्न व्हायचे आहे, ते होईलच. मात्र, पालिका निवडणुकीपूर्वीपासूनच आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्याचे आणि विविध प्रकारे बदनामी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांचे फेसबुक खाते पाहिले तर ते दररोज लाइव्ह येऊन नशेखोरांना मारहाणीचे तसेच इतर प्रकार करत होते. तसेच आमच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढले, मात्र ते जिंकू शकले नाहीत. त्यामुळे आता अशा प्रकारचे आरोप करून आमची बदनामी केली जात आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
