ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आज, एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या मानपाडा गावातून हातात मेणबत्ती घेऊन मार्च काढला. या मार्चमध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर, कोलशेत, ढोकाळी यासह घोडबंदर भागातील गावातून हजोरांच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मार्च पाहताना अनेकजण भावनिक झाले होते.

घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरात २९ सप्टेंबरला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी निर्घृण हत्या केली होती. आज, २९ ऑक्टोबरला प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटला. परंतु या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना अटक झाली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून केला जातो. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असली तरीही त्यांनी हत्या का केली याबाबतचा उलगडा पोलिसांना करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे समर्थक, मानपाडा भागातील नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ कायम आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि तपासाला गती देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हा मेणबत्ती मार्च काढण्यात आला. त्यांची प्रतिमा आणि मेणबत्ती घेऊन मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर, कोलशेत, ढोकाळी यांसह घोडबंदर परिसरातील विविध गावांमधील हजारो नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती.

मानपाडा गावातून सुरू झालेल्या या मार्चमध्ये नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन सहभाग नोंदवला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. मार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दुःख आणि संतापाच्या भावना दिसत होत्या. काही नागरिकांना या घटनेची आठवण होताच भावना अनावर झाल्या. पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठोस कारवाई व्हावी आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. घोडबंदर परिसरातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने या मार्चला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.