ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, संजय राऊतांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “ठाणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनले आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

गृहखाते, पोलिसांवर टीका

सप्टेंबर महिन्यात ठाण्यात पाच लोकांची हत्या झाल्याचे राऊत आज (३० सप्टेंबर) सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याचीही हत्या झाली. राज्याचे गृहखातं काय करतंय? काय करतायेत ठाण्याचे पोलीस, पोलीस आयुक्त, मंत्र्यांचे घरगडी आहेत का?,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. “गृहखात्याची रेंज ठाण्यात पोहोचत नाही का?,” असेही राऊत म्हणाले.

पूर्णेकरांची हत्या का झाली? राऊत म्हणाले…

पूर्णेकरांची हत्या का झाली? याबाबतही राऊतांनी मत मांडले. “पूर्णेकरांनी निवडणूक लढवली आणि फार थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. या भागात बिल्डर लॉबीच्या मदतीने लोकांना बेघर करण्याचे काम सुरु होते. मनोरमा नगर या भागात बिल्डरांना वसाहती निर्माण करायच्या होत्या. क्लस्टरच्या विरोधात पूर्णेकर ठामपणे लढत होते,” असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अमली पदार्थांची समस्या

या भागाचा ताबा अमली पदार्थ तस्करांनी घेतल्याचा आरोपही राऊतांनी यावेळी केला. “अमली पदार्थ तस्करांच्या विरोधातही प्रदीप पूर्णेकरांनी लढा उभारला होता. पोलिसांकडे देखील याबाबत सातत्याने तक्रार केली होती. पूर्णेकर सामाजिक भान ठेवून काम करत होते, पण त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली,” असा दावा राऊतांनी केला. “याची लाज राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाटायला पाहिजे,” असेही टीकास्त्र राऊतांनी सोडले. राऊतांनी एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये देखील, “पूर्णेकर बिल्डर लॉबी आणि ड्रग्स नेटवर्क विरुद्ध ते सतत आवाज उठवत होते,” असे म्हटले आहे.

गुन्हेगारांवर कारवाईची मागणी

संजय राऊतांनी यावेळी पोलिसांवर देखील टीका करत आयुक्तांना हटविण्याची मागणी केली. गृहमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करुन, या घटनेमागील खऱ्या गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. घटनेमागे खरे सूत्रधार शिंदे गटात असल्याचा दावाही राऊतांनी केला.