ठाणे – वडिलांच्या हत्येला आज एक महिना झाला. मात्र, आजही आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. हत्येचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती आहे. त्यामुळे इतर कोणाकडून अपेक्षा नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात ‘देवाभाऊ’ यांच्यावरच विश्वास असल्याने तेच माझ्या कुटुंबाला न्याय देतील, अशी आशा प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. पोलिसांनी करायची कामे आम्हाला स्वतः करावी लागत आहेत, अशी खंत व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलवावे, अशी भावनिक विनंती केली आहे.

ठाण्यातील मानपाडा भागातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप यशवंत पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप न्याय मिळण्याची प्रतीक्षा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची अस्वस्थता कायम आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साद घातली आहे. वडिलांच्या हत्येचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठाण्यात सध्या या हत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलने सुरू आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान राम पूर्णेकर यांनी आपली भूमिका मांडली. ‘माझ्या वडिलांना जाऊन आज एक महिना झाला. मात्र, आजही आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी माझ्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवल्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला तेच न्याय मिळवून देतील, अशी आशा आहे,’ असे राम यांनी म्हटले आहे.

ठाण्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. माझ्या वडिलांच्या हत्येचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची आम्हाला भीती वाटत आहे. इतर कोणाकडूनही मला आता काही अपेक्षा नाहीत. कारण, पोलिसांनी करायला हवी असलेली कामे आज आम्हाला स्वतः करावी लागत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. काही गोष्टी त्यांना प्रत्यक्ष दाखवायच्या आणि सांगायच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला भेटीसाठी बोलवावे, एवढीच विनंती आहे. आजही मला त्यांच्या भेटीची अपेक्षा असून तेच माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ शकतात, असा विश्वास राम पूर्णेकर यांनी व्यक्त केला आहे.