ठाणे : सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा. प्रज्ञा पंडित यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशनच्या शिफारशीनुसार अमेरिकेतील ग्लोबल एन्व्हायर्नमेंटल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका यांच्यातर्फे ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्य, शिक्षण प्रसार तसेच न्याय व समताधिष्ठित समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन प्रा. प्रज्ञा पंडित यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशनच्या शिफारशीनुसार ‘डॉक्टर ऑफ लेटर्स ’ डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. प्रज्ञा पंडित या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
‘तेजस्वी फाउंडेशन’च्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील विविध वृद्धाश्रम, अनाथाश्रम व अपंगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतात. याशिवाय अन्नछत्र केंद्रांच्या माध्यमातून सातत्याने अन्नदानाचे उपक्रम राबवतात. गरजू व वंचित घटकांना मदत करण्या बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कार्यावर त्यांनी भर दिला. सामाजिक क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळांना त्यांनी हजारो पुस्तके विनामूल्य भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावली. तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विनामूल्य कार्यशाळा आयोजित केल्या. ‘तेजस्वी फाउंडेशन’, ‘प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्ग’ व ‘पोएट्री असोसिएशन’ या संस्थांच्या त्या संस्थापिका आहेत. सामाजिक बांधिलकी, ज्ञानदान, साहित्यनिर्मिती व आध्यात्मिक सेवाकार्य या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
