डोंबिवली – धोकादायक स्थितीत झाल्याने गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या, नुतनीकरणाचे काम सुरू असलेल्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी पाहणी केली. सुरू असलेल्या कामाबद्दल काही नव्याने सूचना करून निर्माणाधिन कामाबद्दल अभिनेते दामले यांनी समाधान व्यक्त केले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत नाट्यगृहाचे नुतनीकरण, निर्माणाधिनाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्त गोयल यांनी या भेटीच्या वेळी व्यक्त केला.

गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीला सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील प्रेक्षागृहातील छताचा काही भाग अचानक कोसळला. नाट्यप्रयोग सुरू नसताना आणि प्रेक्षागृहात कोणी नसताना ही घटना घडली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर पालिका प्रशासनाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने १८० कोटीचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला. या निधीतील १५ कोटीचा निधी सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यातील नुतनीकरण कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून सावित्राबाई फुले नाट्यगृह नव्या रूपात उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या प्रकल्प अभियंता रोहिणी लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नुतनीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे.

हे काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया, आलेल्या तांत्रिक अडचणी, जुने बांधकाम कायम ठेऊन नव्याने हाती घेण्यात येणारे काम या सर्वांची जुळवाजुळव करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे या कामाला विलंब होत आहे. दररोज शेकडो लोक नाट्यगृहात येणार असल्याने या कामात कोणत्याही हलगर्जीपणा नको याची काळजी प्रशासनाकडून या नुतनीकरणाच्या कामाच्या निमित्ताने घेतली जात आहे.

अभिनेते दामलेंकडून पाहणी

डोंबिवलीत मोठा नाट्य रसिक प्रेक्षक आहे. विविध प्रकारच्या नाटकांना डोंबिवलीत रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. वर्षभर सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद असल्याने नाट्यनिर्माते, कलाकारांना त्याची झळ बसत आहे. त्यामुळे हे नाट्यगृह लवकर सुरू करावे अशी सर्व नाट्य कलाकारांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई नाट्यगृहाचे नुतनीकरणाचे काम कशा पध्दतीने सुरू आहे हे पाहण्यासाठी रविवारी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आले होते. यावेळी आयुक्त गोयल, कार्यकारी अभियंता लोकरे, उपअभियंता जितेंद्र शिंदे, व्यवस्थापक माणिक शिंदे, प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.

यावेळी नाट्यगृहाच्या मेकअप रूम, प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृह ही कामे पूर्ण झाली आहेत. प्रेक्षागृहातील छत, व्यासपीठ, त्यानंतर आसने लावण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अभियंता लोकरे यांनी दामले यांना दिली. झाल्या कामाबद्दल अभिनेते दामले यांनी समाधान व्यक्त केले. या कामाच्या निमित्ताने नाट्य कलाकारांना आवश्यक असलेल्या काही सूचना दामले यांनी पालिका अधिकारी, प्रकल्प सल्लागारांना केल्या. येत्या १६ ऑगस्टपर्यंत सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील नुतनीकरणाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.

आपल्या पालिका सेवेतील कारकिर्दीत हे काम पूर्ण व्हावे असे लोकरे यांना वाटत होते. पण तांत्रिक अडचणींमुळे त्याला विलंब झाला. कल्याण सॅटिस प्रकल्पाची जबाबदारी लोकरे यांनी आव्हानात्मक पध्दतीने सांभाळली. ३० मे रोजी लोकरे पालिका सेवेतील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.