ठाणे : ओला, उबेर आणि रॅपिडो या अॅप-आधारित टॅक्सी व दुचाकी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या चालकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले आहे. या संपाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले असून संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, असे त्यांनी म्हटले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचा जुना अनुभव सांगत सहकार्य आजही कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज ठाकरे यांना भेटलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे संख्याबळ कमी होते.
भाजपसोबत युती असूनही बहुमत नव्हते. त्या वेळी मनसेचे आठ नगरसेवक ठाणे महापालिकेत होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. राज ठाकरे हे स्वतः ठाण्यात आले होते आणि शिंदे यांच्या तसेच माझ्या विनंतीवरून त्यांनी महापौरपदासाठी आम्हाला सहकार्य केले. त्या काळात हरिश्चंद्र पाटील महापौर झाले. त्यामुळे मनसेचा सहकार्य आम्हाला कालही होते, आजही आहे आणि भविष्यातही राहील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असे त्यांनी म्हटले.
मराठी महापौर वादावर भाष्य
मराठी महापौर या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावर फारसे न बोलता लोकशाहीतील संख्याबळालाच महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाणीवपूर्वक काही संघटना महापौर-उपमहापौर निवडणुकीला विरोध करतात, पण निवडणुकीच्या काळात मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून प्रचार करताना दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकशाहीमध्ये निवडून येणाऱ्यांची संख्या जास्त असते, त्यांनाच प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे त्यांनी जर त्यांचा महापौर निवडला तर त्याचे स्वागत करावे आणि पुढील निवडणुकांसाठी तयारी करावी, असे सांगत पुढील पाच वर्षांत विकास कसा होतो यावर जनतेने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ठाण्यात महायुतीचा महापौर
ठाणे महापालिकेत भाजप किंवा शिवसेनेचा स्वतंत्र महापौर नसून महायुतीचा महापौर आहे. ठाणे असो, मुंबई असो किंवा राज्यातील इतर ठिकाणे, जिथे जिथे महापौर निवडले जातील, ते महायुतीचेच असतील, असे ते म्हणाले. केंद्रात, राज्यात आणि आता ठाण्यामध्येही महायुतीचे सरकार आहे. पुढील पाच वर्षांत महापौर आणि उपमहापौर विकासाची गंगा ठाणे महापालिका क्षेत्रात कशी आणतात, हे आम्ही दाखवून देऊ, असा दावा त्यांनी केला.
महायुतीला प्राबल्य मिळणार
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास दहा-दहा, बारा-बारा सभा घेतल्या आहेत. त्यांच्या सभांना संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहिणींच्या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षांपासून जनतेशी संवाद साधत आहेत आणि पुढेही तो सुरू राहील, असेही ते म्हणाले.
राज्यात होणाऱ्या १२ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट प्राबल्य मिळेल आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीची जबाबदारीही महायुतीकडेच येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर मालकांवर कारवाई
आम्ही ओला, उबेर, रॅपिडोच्या चालकांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या संपामुळे सामान्य लोकांचे हाल होणे योग्य नाही. राज्य शासनाकडून त्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे, काय अपेक्षा आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे सांगावे. त्या सर्व बाबींमध्ये राज्य शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील. या संपूर्ण प्रक्रियेत आरटीओचे अधिकारीही चालक संघटनांच्या संपर्कात असून भविष्यात काही अडचणी किंवा प्रश्न उद्भवल्यास ते सोडवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असेल. तसेच ओला-उबेर-रॅपिडोचे मालक जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील, चालकांवर अन्याय करत असतील तर त्यांच्यावरही राज्य शासन योग्य ती कारवाई करेल,” असा इशारा त्यांनी दिला.

