ठाणे : महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे, हे योग्य नाही, असे सांगत महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल, तर मराठी अनिवार्य आहे, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा दिला आहे. आरटीओच्या माध्यमातून १ मे पासूनची आमची मोहीम राबविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत आंदोलन आणि मोर्चांना भीक घालणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ओवळा-माजिवडा मतदारसंघात विहीर पुनर्जीवित प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम सोमवारी लोकमान्यनगर येथे पार पडला. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत, कोणत्याही आंदोलनाला भीक घालणार नसल्याचे स्पष्ट केले. मीरा-भाईंदर शहरात मराठी येत नसलेल्या वाहनचालकांची छाननी सुरू असून २९ एप्रिलला याबाबतचा अहवाल येणार आहे. तसेच ३० तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय हा नवीन नसून २०१९ पासूनच अस्तित्वात आहे. मी काय चुकीचा बोललो, महाराष्ट्रात जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर त्या चालकाला मराठी समजण्या इतके तरी मराठी यायला हवे, असे सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा गुणगान मात्र हिंदीचे गायचे हे योग्य नाही. इतर राज्यात हिंदी बोलल जाते का, मग महाराष्ट्रात मराठी बद्दल अभिमान असणे चुकीचे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून १ मे पासूनची आमची मोहीम कायम आहे, असेही ते म्हणाले.

विहीर पुनर्जीवित प्रकल्प

अनेक विहिरींमध्ये घाण साचल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहिले नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, गेल्या दोन वर्षांत विहिरी स्वच्छ करून त्यावर आरओ प्लांट बसवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.