ठाणे : ठाण्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून शिंदे शिवसेनेवर टिका होत आहे. असे असतानाच, या हत्या प्रकरणावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींना भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हत्या प्रकरणाचा राजकीय फायदा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली.
शिवसेना पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले असून यावरून सरनाईक यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली. सदावर्ते यांना राज्यात कोण ओळखते, एखाद्या चित्रपटातील विदुषकाप्रमाणे ते चाळे करत असतात. अशा घटनांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, असे सरनाईक म्हणाले.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही आपल्या राजकीय कारकीर्दीतील अत्यंत गंभीर घटना असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. जयनाथ पूर्णेकर हे आमचे मित्र आहेत. घटनेनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी शिंदे बाहेरगावी असल्यामुळे घटनास्थळी जाऊ शकले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निष्पक्ष तपासाच्या पोलिसांना सूचना
या प्रकरणात शिंदे यांचा हस्तक्षेप असता, तर संबंधितांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेच नसते, असा दावा सरनाईक यांनी केला. शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोषींवर कारवाई करून त्यांना अटक करावी व तपासात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे निर्देशही देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
वर्चस्व कमी करण्यासाठी आरोप
शिवसेनचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ठाणे महापालिकेतील सत्ता तसेच खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची क्षमता यामुळे जिल्ह्यात शिंदे यांचे वर्चस्व आहे. ते कमी करण्यासाठी काही लोक पूर्णेकर यांच्या हत्येचा राजकीय वापर करीत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना पूर्णेकर यांच्या घरी सांत्वनासाठी जाऊ नये, असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. शहरातील आपले आमदार, मित्रपक्षांचे लोकप्रतिनिधी व अन्य पदाधिकारी जनतेच्या मदतीसाठी काम करत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
‘भरचौकात फाशी दिली पाहिजे’
मी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा निषेध केला होता. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. या प्रकरणात जे आरोपी असतील आणि जे दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे, अशी भूमिका मी शिवसेनेचा मंत्री म्हणून पहिल्यापासून घेतली आहे. ठाणे महापालिका क्षेत्र असो किंवा संपूर्ण ठाणे जिल्हा, अशा घटनांचा सर्वप्रथम निषेध एकनाथ शिंदे हे करत असतात. त्यामुळे या घटनेचा कोणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकरणातील आरोपींना पोलीस शिक्षा करतील आणि त्यांना फाशीची शिक्षा होईल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
