ठाणे : मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आता पाणी, शेती, रोजगार आणि सर्वांगीण विकासासाठी लढायचे आहे. मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ही मराठवाड्याच्या शेवटच्या माणसाच्या जीवनात विकास पोहोचवण्यातच आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने रविवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यात सत्कार स्वीकारताना प्रताप सरनाईक बोलत होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामात असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष केला आणि अनेकांनी प्राणांची आहुती दिली.

त्यामुळे आजचा दिवस केवळ इतिहास स्मरण्याचा नसून त्या बलिदानातून विकासाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे असे सरनाईक म्हणाले. मुक्तिसंग्राम संपला. पण संघर्ष संपलेला नाही. धाराशिव जिल्ह्यात पावसातील तूट आणि पावसाच्या दीर्घ खंडामुळे पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्याने बी-बियाणे, खत आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्ने पेरली. मात्र, पाऊस साथ देत नसेल तर त्याने कोणाकडे पाहायचे असा प्रश्न सरनाईक यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री म्हणून धाराशिवमधील परिस्थितीकडे केवळ कागदावरील आकडे म्हणून पाहिले जाणार नाही, असे स्पष्ट करत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा, पिकांची प्रत्यक्ष पाहणी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत याबाबत प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.