‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ : जोशी-बेडेकर महाविद्यालयाचा प्रथमेश्वर उंबरे ठाणे विभागातून प्रथम

लोकसत्ताने विभागीय अंतिम फेरीसाठी दिलेल्या विषयांमुळे बराच अभ्यास करायला मिळाला.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या ठाणे विभागाची अंतिम फेरी शुक्रवारी ठाणे येथील सहयोग मंदिर सभागृहात पार पडली. या वेळी ठाणे विभागीय अंतिम फेरीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना डावीकडून परीक्षक ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस, प्रथम क्रमांक विजेता प्रथमेश उंबरे आणि परीक्षक प्राध्यापिका मीना गुर्जर. (छाया – दीपक जोशी)

ठाणे : सामाजिक  तसेच राजकीय विचारांना मांडणीची जोड देत सहा वक्त्यांनी त्यांची परखड मते ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत शुक्रवारी मांडली. यामध्ये ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रथमेश्वर उंबरे याने ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेत ठाणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला. तर, बि.के.बिर्ला महाविद्यालयाच्या यश पाटील याने द्वितीय क्रमांक आणि सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची आर्या सबनीस हिने तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात पार पडली.

सामाजिक जाणिवा जागृत होतील अशा वैविध्यपूर्ण आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विषयाचे सादरीकरण करण्याची तरुण वक्त्यांना संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष आहे. तरुणांना त्यांचे विचार परखडपणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या लोकसत्ताच्या वक्तृत्व स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी मोठय़ा उत्साहात पार पडली.

महाअंतिम फेरीत ठाणे विभागाचे नेतृत्व करणाऱ्या प्रथमेश्वर उंबरेसह यश पाटील आणि आर्या सबनीस हिने ‘महाविकासाची युती’ या विषयावर आपले मत मांडले. अनिकेत पाळसे याने ‘मंदिरातला राम’ या विषयाचा उलगडा करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले, तर चांदणी गावडे हिने ‘काश्मीरची जमीन आपलीच’ या विषयाची मांडणी करून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण प्राध्यापिका मीना गुर्जर आणि ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी केले. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ची राज्यस्तरीय महाअंतिम फेरी १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मुलुंड येथील मराठा मंडळ सभागृहात पार पडणार आहे. राज्याच्या आठ केंद्रांमधून निवडण्यात आलेले आठ वक्ते त्यांचे विचार महाअंतिम फेरीत मांडतील.

लोकसत्ताने विभागीय अंतिम फेरीसाठी दिलेल्या विषयांमुळे बराच अभ्यास करायला मिळाला. या विषयांचा अभ्यास केल्यामुळे विचारांमध्ये भर पडली, अशी प्रतिक्रिया या स्पर्धेत द्वतीय क्रमांक पटकावलेल्या यश पाटील आणि तृतीय क्रमांकाची मानकरी आर्या सबनीस यांनी दिली.

*****

अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तम मते मांडली. प्रत्येक वक्त्याची भाषा उत्तम असली पाहिजे. तसेच विषय मांडताना ओठांची हालचालही महत्त्वाची असून त्यामुळे शब्दांचा उच्चार अतिशय स्पष्ट होतो. प्रत्येक वक्त्याला शिस्तप्रिय गुरूची गरज असते. गुरूमुळे एक चांगला वक्ता घडतो. –

उदय सबनीस, ज्येष्ठ अभिनेते- परीक्षक

*****

स्पर्धकांना देण्यात आलेले विषय हे ज्वलंत होते. या विषयावर बोलणे एकीकडे कठीण तर एकीकडे अवघड होते. प्रत्येक स्पर्धकांनी विषय मांडण्यासाठी  ‘गुगल’सह त्या विषयाचे तज्ज्ञ असणारी व्यक्ती आणि पुस्तकांची मदत घेतली ही आनंदाची बाब आहे. अनेक विद्यार्थ्यांचे विषय सारखे होते, परंतु ते मांडण्याची पद्धत वेगळी होती. प्रत्येक स्पर्धकाने उत्तम प्रकारे आपले विचार मांडले.

-मीना गुर्जर, प्राध्यापिका- परीक्षक                                                 

विभागीय फेरीसाठी देण्यात आलेले सर्व विषय कठीण होते. त्यामुळे माझा अभ्यास असलेल्या विषयाची निवड केली. त्याबाबतचे अधिक वाचन करून स्पर्धेत सादरीकरण केले. आता महाअंतिम फेरीसाठी जोरदार तयारी करणार आहे.

-प्रथमेश्वर उंबरे, प्रथम क्रमांक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prathamesh umbare first in loksatta oratory competition from thane zws