नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टीसह संपूर्ण मैदान विकसित केले असले तरी वाहने उभी करण्यासाठी आवश्यक क्षमतेचे वाहनतळ आणि पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगचे सामन्यांसाठी ठाण्याला यजमानपद मिळावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यंदाही यश आले नाही.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा

पुढील वर्षी आयपीएलच्या सामन्यांना आवतण देत असताना हे अडथळे उभे राहू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने क्रीडा प्रेक्षागृहाच्या परिसरातच तात्पुरते आणि पुरेशा क्षमतेचे वाहनतळ उभे करता येऊ शकते का यासंबंधीची चाचपणी सुरू केली आहे. यासोबत मैदानात अद्ययावत विद्युत व्यवस्था उभी राहावी यासाठीही चाचपणी केली जात आहे.

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात दर्जात्मक सामने आयोजित व्हावेत यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने प्रेक्षागृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. २०१८-१९ मध्ये बीसीसीआय आणि आयसीसी यांच्या अटी व शर्तीप्रमाणे देशातील नामवंत क्युरेटर नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्यात आले. या मैदानात जानेवारी २०२० मध्ये बीसीसीआय प्रथमश्रेणीच्या महिलांचे १२ सामने खेळविण्यात आले. तर २५ वर्षांनी बीसीसीआयने प्रथमश्रेणीतील विजय हजारे ट्रॉफीचे सामने या मैदानात खेळविले.

विद्युत व्यवस्थेमुळे संधी हुकली?

यंदाच्या वर्षी या मैदानात आयपीएल सामने होऊ शकतात का याची पाहणी बीसीसीआयच्या पथकाकडून करण्यात आली होती. परंतु पुरेसे वाहनतळ आणि विद्युत व्यवस्था नसल्यामुळे मैदानात यंदा हे सामने होऊ शकले नाहीत. असे असले तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या (आरसीबी) संघाने या मैदानाची निवड करत सराव सुरू केला आहे. त्यामुळे यंदा हुकलेली संधी पुढच्या वर्षी गमवायची नाही असा चंग क्रीडा विभागाने बांधला असून यातूनच आता अद्ययावत विद्युत व्यवस्था उभारणीबरोबर क्रीडा प्रेक्षागृहातील छतावरचे पत्रे बदलण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्याचबरोबर क्रीडा प्रेक्षागृहाच्या परिसरात तात्पुरते वाहनतळाची व्यवस्था निर्माण होऊ शकते का, यासाठी जागांची पाहणी सुरू केली आहे, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात ३५ हजारांची आसन क्षमता आहे. त्या तुलनेत प्रेक्षागृहात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. यामुळेच मैदानात यंदा आयपीएल सामने होऊ शकले नाहीत. पुढच्या वर्षी आयपीएल सामने व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी परिसरातील मोकळय़ा जागांवर वाहनतळाची सुविधा निर्माण होऊ शकते का याचा विचार सुरू असून त्याप्रमाणे काही जागांची पाहाणी करण्यात आली आहे. याशिवाय, मैदानात अद्ययावत विद्युत व्यवस्था, डिजिटल धावफलक लावण्यात येणार आहे. – मीनल पालांडे, क्रीडा अधिकारी, ठाणे महापालिका