scorecardresearch

गर्भवती, बालकांसाठीचे रुग्णालय सज्ज

ठाणे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयास करोना रुग्णालय जाहीर करण्यात आले आहे.

मनोरुग्णालयाजवळ २०० खाटांचे रुग्णालय

ठाणे : ठाणे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयास करोना रुग्णालय जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून करोना बाधित नसलेल्या गर्भवती महिला, बालकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. या महिला आणि बालकांची होणारी फरफट आता दूर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने सुमारे २०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात या रुग्णालयाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातून हजारो नागरिक उपचारासाठी येत असतात. गर्भवती महिला, बालकांचेही उपचारासाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. रुग्णालयाची क्षमता कमी असल्याने तसेच हे रग्णालय काहीसे धोकादायक झाल्याने याठिकाणी नव्याने रुग्णालय बांधले जाणार आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी रुग्णांना इतरत्र हलविले जाणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय करोना विशेष रुग्णालय घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयाचे   नव्याने बांधकाम करणे रखडलेले आहे. करोना रुग्णालयाची घोषणा झाल्याने करोनाबाधित नसलेल्या गर्भवती महिला आणि लहान बालकांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. या रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालये किंवा ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावरही रुग्णांचा भार वाढू लागला आहे. गर्भवती महिला, नवजात बालके, लहान मुले यांची फटफट होत असल्याने हा प्रकार टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मनोरुग्णालयाजवळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने तीनमजली सुमारे २०० खाटांचे सुसज्ज असेल रुग्णालय तयार केले आहे. या सर्व खाटांसाठी प्राणावायु उपलब्ध असणार आहे. तसेच ६ हजार लीटर द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पही या रुग्णालयाजवळ उभारण्यात आला आहे. 

मनोरुग्णालयाजवळ सुमारे २०० खाटांचे रुग्णालय गर्भवती महिला, नवजात बालके आणि लहान मुलांच्या उपचारासाठी बांधण्यात आले आहे. काही परवानग्या शिल्लक आहेत. लवकरच या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येईल.

– डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prepared hospital pregnant pediatric ysh

ताज्या बातम्या