scorecardresearch

डोंबिवलीतील मनसे कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, ठाकरे समर्थक स्तब्ध

मुख्यमंत्री शिंदे यांचे मनसे कार्यालयात आगमन होताच मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत गेले.

eknath shinde pramod patil
मनसे कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना मनसेचे आ. प्रमोद पाटील.

डोंबिवली– श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे चैत्र पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक फडके रस्त्यावरील मनसेच्या मध्यवर्ति कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री शिंदे यांचे मनसे कार्यालयात आगमन होताच मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत गेले.

यावेळी एकमेकांनी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. शुभे्च्छांचा स्वीकार केल्यानंतर काही क्षणात मुख्यमंत्री शिंदे मनसे कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्या सोबत खा. डाॅ. श्रीकांत शिंदे होते. दोन वर्षापासून कल्याण, डोंबिवली परिसरातील विकास कामांवरुन आ. प्रमोद पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेषता खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना ट्विटच्या माध्यमातून लक्ष्य करत आहेत. विकास कामे आणि निधीच्या घोषणा करुन प्रत्यक्षात विकास कामांची अंमलबजावणी होत नसल्याचा आ. पाटील यांच्या टीकेचा रोख आहे. या टीकेला खा. शिंदे किंवा समर्थकांकडून यापूर्वी तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जात होते. यामुळे नाहक स्थानिक राजकीय वातावरण गढूळ होत होते. विकास कामांपेक्षा या व्दंदाची चर्चा अनेक दिवस सुरू राहत होती. गेल्या वर्षी एमआयडीसीतील रस्ते, खड्ड्यांवरुन आ. पाटील यांनी शिंदे पिता-पुत्रांना फलकबाजीतून लक्ष्य केले होते. त्यावेळी शिवसेना-मनसेतील फलक युध्द गाजले होते.

हेही वाचा >>> राज्याचा सर्वांगीण विकास हाच शिवसेना-भाजपचा अजेंडा, डोंबिवलीत स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यावर कल्याण लोकसभा हद्दीत पाटील आणि खा. शिंदे यांच्यात सुरू असलेले व्दंद कमी करण्याची सूचना आणि आ. पाटील किंवा अन्य कोणालाही प्रत्युत्तर न देण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वता चिरंजीवाला केली होती, अशी त्यावेळी चर्चा होती. मख्यमंत्र्यांचा मुलगा स्थानिक पातळीवर विकास कामांवरुन स्थानिक लोकप्रतिनिधींशी वादावादी करतो हा विषय चर्चेला येत असल्याने खा. शिंदे यांनी पिताश्रींच्या आदेशाची अंमलबजावणी गेल्या वर्षापासून सुरू केली. खा. शिंदे यांच्याविषयी आ. पाटील यांनी काहीही ट्विट केले की त्याला सुरुवातीचे काही दिवस डोंबिवली शहराध्यक्ष राजेश मोरे, माजी सभापती दीपेश म्हात्रे प्रत्युत्तर देत होते. नंतर मोरे यांनी माघार घेतली. अलीकडे कधीतरी दीपेश म्हात्रे आ. पाटील यांच्या बरोबरच्या ट्विटर व्दंदात एकटेच उतरतात.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये स्वागत यात्रेचा उत्साह

अतिथीचा आदर ही संस्कृती – आ. पाटील

दारात पाहुणा आला तर त्याचे स्वागत करणे ही हिंदू धर्म संस्कृती आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे निवासी एकनाथ शिंदे स्वागत यात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीत आले होते. गणेश मंदिरा जवळील कार्यक्रमाच्या बाजुला मनसेचे कार्यालय असल्याने आपण मुख्यमंत्री शिंदे यांना कार्यालयात येण्याची विनंती केली. ती त्यांनी तात्काळ मान्य केली. कार्यालयात त्यांचा मनसेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला, अशी माहिती मनसेेचे आ. प्रमोद पाटील यांनी दिली.

राजकारण म्हटले की हेवेदावे, चढाओढीची गणिते असतात. प्रत्येक वेळी १२ महिने २४ तास राजकारणच केले पाहिजे असे नसते. काही वेळा आपली संस्कृती, सामाजिक सलोख्याचा विचार करुन राजकीय जोडे, विचार बाजुला ठेऊन सामाजिक भान ठेऊन एकत्र येणे ही काळाची गरज असते. त्या भावनेतून मुख्यमंत्री शिंदे यांना आपण कार्यालयात बोलविले आणि त्यांचा सन्मान केला, असे आ. पाटील म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयात आले म्हणजे तात्काळ मने, मते जुळली असे होत नाही. हा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. आताची बाहेरील परिस्थिती खूप बिकट आहे. लोक नागरी विकास कामांवरुन खूप संतप्त आहेत. या परिस्थितीत मनसेला खूप वाव आहे. म्हणुनच राज ठाकरे तरुणांना राजकारणात पुढे या असे नेहमी आवाहन करतात, असे पाटील म्हणाले.

सामाजिक भावनेतून ऐक्य- मंत्री चव्हाण

जेव्हा सण, उत्सव, संस्कृती जतनासाठी समाज मोठ्या संख्येने एकत्र येतो. तेव्हा राजकीय जोडे बाहेर ठेवायचे असतात. शेवटी हिंदू धर्म संस्कृतीचा विचार केला तर सामाजिक संघटन खूप महत्वाचे आहे. असे संघटन मजबूत होण्याचे स्वागत यात्रा ही महत्वाची ठिकाणे आहेत. म्हणून अशा कार्यात विविध पक्षांच नेते, पदाधिकारी एकत्र येतात, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

ठाकरे समर्थक स्तब्ध

स्वागत यात्रेच्या वाटेवर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थक मंचकावरुन पुष्पवृष्टी करत स्वागत करत होते. या मंचकासमोरुन मुख्यमंत्री शिंदे जात असताना त्यांनी मंचकाच्या दिशेने पाहून ठाकरे समर्थकांना शुभेच्छांसाठी नमस्कार केला. त्यावेळी ठाकरे समर्थकांनी कोणताही प्रतिसाद न देता स्तब्ध राहणे पसंत केले. याविषयाची चर्चा स्वागत यात्रेत सुरू झाली होती.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:50 IST

संबंधित बातम्या