ठाणेः कॅमेऱ्यासमोर अभिनयाची जादू दाखवणारे सिनेसृष्टीतील नामांकित कलाकार आता क्रिकेटच्या मैदानात खेळ सादर करताना दिसणार आहेत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सुरू असलेल्या टेनिस क्रिकेटच्या ”प्रेसिडेंट कप २०२६” मध्ये उद्या, शनिवारी ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ”सेलिब्रिटी क्रिकेट”चा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेता सौरभ गोखले यांचे दोन संघ या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील. इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रेसिडेंड कप ही स्पर्धा सुरू आहे.
३१ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले होते. सध्या या स्पर्धेत विविध राज्यातील तब्बल १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या संघांमध्ये चुरशीचे सामने सुरू आहेत. तर टेनिस क्रिकेट चाहत्यांचाही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर येत्या ५ एप्रिल रोजी स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने रंगतील.
एकीकडे हे सामने सुरू असताना आता याच स्पर्धेत मराठी सिने, मालिका क्षेत्रातील कलाकार मैदानात उतरणार आहेत. अभिनेते, अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक, गायक असे सर्व कलाकार आता ”क्लॅश ऑफ सुपरस्टार्स” या संकल्पनेखाली मैदानात उतरणार आहेत. शनिवार, सायंकाळी सायंकाळी ५ वाजता हा सामना ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रंगेल.
असे आहेत संघ
सौरभ गोखले संघ: कल्याणी जाधव, ऋतुराज फडके, माधव देवचके, शुभंकर तावडे, आदिश वैद्य, तेजस बर्वे, अमोल नाईक, महेश लिमये, सक्षम कुलकर्णी, मंगेश बोरगावकर, राजेश भोसले, देवेंद्र शेलार, अभिलाष चौधरी आणि तेजस नेरुरकर.
संजय जाधव संघ: संजना पाटील, हर्षद अतकरी, पृथ्वीक प्रताप, शशांक केतकर, सिद्धार्थ बोडके, ओमप्रकाश शिंदे, अभिनय बेर्डे, अक्षय केळकर, सुशांत शेलार, उमाकांत पाटील, विवेक सांगळे, रोहित शिवलकर, सुयश टिळक आणि विनय राऊत.
टेनिस क्रिकेट फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या सामन्यात मराठी कलाकारांच्या माध्यमातून चौकार आणि षटकारांची आतिशबाजी पाहायला मिळणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहण्याची संधी ठाणेकर क्रिकेटप्रेमींना मिळणार असून हे सर्व सामने क्रिकेट चाहत्यांसाठी मोफत आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
