ठाणे जिल्ह्य़ाला उल्हासनगरमधून छुप्या पद्धतीने पुरवठा

भगवान मंडलिक

Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
loksatta analysis measures to prevent river water from pollution in maharashtra
विश्लेषण : राज्यातील नद्या केव्हा स्वच्छ होणार?

कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या पुरवठय़ाचे काम उल्हासनगरमधून छुप्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. अशा प्लास्टिक उत्पादक कंपन्या, त्यांची गोदामे शोधून त्या कायमस्वरुपी बंद करण्याच्या जोरदार हालचाली कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण विभागाने सुरू केल्या आहेत. शासनाने पाच मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वस्तू, पिशव्या विक्रीवर बंदी आणली आहे. शासन आदेशाची सुरुवातीला अंमलबजावणी यंत्रणांनी कठोर अंमलबजावणी केली. ही कारवाई थंड पडताच उल्हासनगरमधील उत्पादक पुन्हा चोरून, छुप्या पद्धतीने प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन करून ते राजरोसपणे ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर, मुरबाड, डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात विक्री करू लागले आहेत.

हा व्यवहार उत्पादक व खरेदीदार व्यापारी बेमालूमपणे करत असल्याने पालिका अधिकारी, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना हे व्यवहार निदर्शनास येत नाहीत. प्रतिबंधित प्लास्टिकचे सर्वाधिक कारखाने उल्हासनगरमध्ये असल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अधिकाऱ्यांना मिळाली आहे. कल्याण, डोंबिवलीत गेल्या दोन वर्षांपासून प्लास्टिक मुक्त शहर मोहीम जोरदारपणे राबविली जात आहे. सुरुवातीला शहरातून प्लास्टिक गायब होऊन कापडी, कागदाच्या पिशव्या वापरण्यास फेरीवाले, किराणा दुकानदार, व्यापारी संकुलातील चालकांनी सुरुवात केली होती. काही महिन्यांपासून पुन्हा कल्याण डोंबिवलीत नवीन उत्पादित प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर फेरीवाले, दुकानदारांनी सुरू केल्याचे कल्याण डोंबिवली पालिकेतील घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या निदर्शनास आले.

कोकरे यांच्या आदेशावरून कल्याण, डोंबिवली, बाजार समिती, घाऊक बाजार, टिटवाळा, मासळी बाजार, किराणा दुकाने याठिकाणी पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांच्या पथकाने छापे मारून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसात पथकांनी व्यापाऱ्यांकडून दोन ते तीन हजार किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. व्यापाऱ्यांकडून एकूण सहा लाख रुपयांचा दंड पथकाने वसूल केला.  चौकशीदरम्यान विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्या उल्हासनगरमधून आणल्याची माहिती पथकाला दिली आहे. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उल्हासनगरमधील कारखान्यांवर कारवाई करण्याबाबत कोकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांच्याशी चर्चा केली. 

विक्रेत्यांकडे नव्याने उत्पादित केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत. या पिशव्या उल्हासनगरमधून आणतो असे दुकानदार सांगतात. प्लास्टिक उत्पादनाचे मूळ उल्हासनगर असल्याने येथील कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या साहाय्याने कारवाई करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

– रामदास कोकरे; उपायुक्त  घनकचरा विभाग, कल्याण डोंबिवली पालिका

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर वाढला आहे. उल्हासनगरमधील काही उत्पादक छुप्या पद्धतीने हे उत्पादन घेत असल्याचे सांगण्यात येते. कारवाईसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे. नागरिकांनी ही माहिती दिली तरी कारवाई केली जाईल.

– शंकर वाघमारे; प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण