अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका ; अनेक भाज्यांच्या किमती शंभरी पार

काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये प्रति किलोने विकले जाणारे टोमॅटो सध्या १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि राज्यभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई महानगर क्षेत्राला होणारा कृषिमालाचा पुरवठा रोडावल्याने गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच भाज्यांचे भाव वधारले आहेत. पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातील बागायती पट्टय़ात अवेळी पाऊस झाल्याने गेल्या २४ तासांत प्रमुख भाज्यांनी शंभरी ओलांडली असून या दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.  

राज्यातील विविध भागांत मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक २० ते २५ टक्क्यांनी घटल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर िपगळे यांनी दिली. वाशी येथील घाऊक बाजारात एरवी दिवसाला ६०० ते ७०० गाडय़ा दाखल होत असतात. मागील काही दिवसांपासून हे प्रमाण दररोज सरासरी ५० ते १०० गाडय़ांनी घटले आहे. त्यामुळे घाऊक बाजारातही काही भाज्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात ५० रुपये प्रति किलोने विक्री केली जात असलेली भेंडी सध्या ७० रुपयांपर्यंत वधारली आहे, तर  ६० रुपये प्रति किलोने विक्री केली जाणारी गवार ८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये प्रति किलोने विकले जाणारे टोमॅटो सध्या १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पालेभाज्यांची आवक घटली

अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. घाऊक बाजारात आठ रुपयाने विकली जाणारी पालकची जुडी किरकोळ बाजारात २० रुपयांनी विकली जात आहे, तर ९ ते १४ रुपयांनी विकली जाणारी मेथीची जुडी तीस रुपयांनी किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे. शेपूची जुडीही २० रुपयांनी विकली जात असल्याची माहिती पालेभाज्या विक्रेत्यांनी दिली.

भाज्यांचे दर

भाज्या        घाऊक       किरकोळ

भेंडी          ७०           १२०

फरसबी        ५०           १२०

गवार          ४०           ८०

वांगी          ४०           ८०

शिमला मिरची   ७०           १००

कारले         २६           ८०

कोबी         २०          ८०

टोमॅटो         ४०           १००

इंधन दरवाढीचा फटका भाज्यांवर बसलेला असतानाच यंदा अवकाळी पावसामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे त्यांच्या दरांत वाढ झाली आहे.

शंकर पिंगळे, संचालक, एपीएमस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prices of many vegetables increase due to unseasonal rains zws

Next Story
ठाणे जिल्ह्यात रिमझिम पाऊस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी